September 26, 2026

-प्रत्येकामध्ये असामान्य व्यक्तिमत्व दडलेली असतेज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचे मत : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन

0
IMG-20260814-WA0049
Spread the love

पुणे : आम्ही दिव्यांच्या झगमगाटात असतो, त्यामुळे तुम्हाला आमचे कौतुक वाटते. मात्र, आम्ही काही असामान्य व्यक्ती नाही. आम्ही देखील इतरांप्रमाणेच आहोत. घरातील जबाबदाऱ्या पार पाडून आपले काम करणे देखील एक कलाच आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतो. प्रत्येक सामान्य माणसामध्ये एक असामान्य व्यक्ती दडलेली असते. फक्त ती दिसत नाही, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केले.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे आयोजित म्हसोबा उत्सवांतर्गत मंडईतील बुरूड आळी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उत्सवांतर्गत भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, दीपक उर्फ बाबा मिसाळ, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ सिनेनाटय अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते व्यापार भूषण पुरस्कार रांका ज्वेलर्सचे संचालक फत्तेचंद रांका, उद्योग भूषण पुरस्कार कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेडचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया, पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ संपादक श्रीकांत साबळे, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, संगीत भूषण पुरस्कार संगीत दिग्दर्शक, गीतकार अविनाश-विश्वजीत, तसेच धार्मिक भूषण पुरस्कार विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांना प्रदान करण्यात आला. महावस्त्र, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, फळांची करंडी आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याशिवाय ज्येष्ठ सिनेनाटय अभिनेते मोहन जोशी आणि मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक सुमित जव्हेरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

ह.भ.प. गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर म्हणाले, आज पावती फाडून देखील दानपेटीतून किती घोटाळे होतात, हे आपण पाहत आहोत. परंतु असे असतानाही केवळ जाहिरातीच्या माध्यमातून नव्हे, तर सामाजिक बांधिलकीतून मोठे काम करणारी अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट ही संस्था आहे. तुकोबाराय म्हणतात, आपल्याला मिळालेल्या पैशातून स्वतःचे कर्तृत्व वाढविण्यापेक्षा त्यातून इतरांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.आपल्याला मिळालेल्या एक लाख रुपयांतून एक काम होते; परंतु एका आशीर्वादातून एक लाख कामे होतात

निवृत्ती जाधव म्हणाले, गेल्या २७ वर्षांत संस्थेच्यावतीने १३ कोटी रुपयांचे सामाजिक कार्य करण्यात आले आहे. गरजूंना मदतीचा हात देण्यापासून ते स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यापर्यंत अनेक प्रकारचे कार्य ट्रस्ट तर्फे करण्यात येते. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात ट्रस्ट वर्षभर कार्यरत असून धार्मिकतेतून सामाजिकतेकडे वाटचाल सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

  • फोटो ओळ : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे आयोजित म्हसोबा उत्सवांतर्गत मंडईतील बुरूड आळी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उत्सवांतर्गत भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर व सन्मानार्थी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी