ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशनतर्फे पंडित रूपक कुलकर्णी यांचा गुरूपूजन सोहळा साजरासमूह आणि एकल बासरीवादनाचे अर्घ्य अर्पण करणारा कृतज्ञ भाव
पुणे : गुरुंकडून लाभलेल्या कलाज्ञानाची ओंजळ कृतज्ञतेने गुरुचरणी अर्पण करण्याचा भाव मनात ठेवून, समूह आणि एकल बासरीवादनाची अभिव्यक्ती रसिकांनी रविवारी सायंकाळी अनुभवली. ज्येष्ठ बासरीवादक आणि गुरू पंडित रूपक कुलकर्णी यांच्या शिष्यवृंदाने आयोजित केलेल्या गुरूपौर्णिमेच्या सोहळ्यात बासरीवादनासह सरोदवादनाचा आनंदही श्रोत्यांना मिळाला.
ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशनच्या वतीने पंडित रूपक कुलकर्णी यांच्या शिष्यसमुदायाने गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूंच्या अभिवादनाचा सोहळा नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात रविवारी आयोजित केला होता. ज्येष्ठ शहनाईवादक पंडित शैलेश भागवत यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे समूह बासरीवादन सादर झाले. मोझार्ट या विख्यात विदेशी संगीतकाराची सिंफनी २५ या नावाने गाजलेली टायटन ॲड रचना सुरवातीला पेश झाली. पाठोपाठ शिष्यांनी भूप, यमन, भीमपलास आदी रागांतील आलापी आणि बंदिशींचे सादरीकरण केले. तसेच ‘कानडा राजा पंढरीचा’ या गीताचे समूह सादरीकरणही केले. त्यानंतर मृगेंद्र मोहाडकर यांचे एकल बासरीवादन झाले. त्यांनी मालकंस राग सादर केला. त्यांना सौरभ गुळवणी यांनी तबल्याची साथ केली.
मध्यंतरात पंडित रूपक कुलकर्णी यांचा गुरूपूजन सोहळा झाला. शिष्यांच्या वतीने पंडित रूपक कुलकर्णी यांचे मंगलदीपांनी औक्षण करून, त्यांना अभिवादन करण्यात आले. उत्तरार्धात युवा सरोदवादक अनुपम जोशी यांनी उस्ताद अली अकबर खां यांनी रचलेला राग चंद्रनंदन सादर केला. विलंबित त्रितालातील धीरगंभीर वादन आणि नंतर द्रुत तीनतालातील गतवादनाने तसेच तबलावादक महेशराज साळुंखे यांच्या साथीने सवालजबाबसदृश जुगलबंदीही रंगतदार झाली. रसिकांच्या आग्रहास्तव अनुपम जोशी यांनी सरोदवर अभंगमाला सादर केली. ‘कानडावु विठ्ठलु’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘खेळ मांडियेला वाळवंटीकाठी’, ‘कानडा राजा पंढरीचा’ अशा भक्तीरचनांचा त्यात समावेश होता.
गुरू पंडित रूपक कुलकर्णी यांच्या सुरेल बासरीवादनाने या गुरूपूजन सोहळ्याची सांगता झाली. त्यांनी राग झांज मल्हार (यालाच वृंदावनी मल्हार असेही म्हटले जाते) सादर केला. सुरवातीला अतिशय हळुवार असे वादन करत, नंतर तबल्याच्या साथीने त्यांनी रागस्वरूप उलगडत नेले. त्यांना पंडित मुकेश जाधव यांनी रंगत वाढविणारी तबलासाथ केली. मृगेंद्र मोहाडकर, जयकिशन हिंगू आणि लीतेश जेठवा यांनी साथसंगत केली. ९ मात्रांच्या मत्ततालातील आणि द्रुत त्रितालातील वादनाला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. रजत जोशी आणि सखी चंद्रयाण यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमात (डावीकडून) पंडित मुकेश जाधव, जयकिशन हिंगू, पंडित रूपक कुलकर्णी, लीतेश जेठवा, मृगेंद्र मोहाडकर.
प्रति,
मा. संपादक
ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशनच्या वतीने पंडित रूपक कुलकर्णी यांच्या शिष्यसमुदायाने गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूंच्या अभिवादनाचा सोहळा नवी पेठ येथील एस. एम. जोशी सभागृहात रविवारी आयोजित केला होता. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
मृगेंद्र मोहाडकर, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
