July 13, 2026

एआरएआय टेकडीवर ३ हजार देशी वृक्षांची लागवडभांबुर्डा वन विभाग, महा एनजीओ फेडरेशन आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज यांचा पुढाकार ; ३४० हून अधिक स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध सामाजिक घटकांचा पर्यावरण संवर्धनासाठी उत्स्फूर्त सहभाग

0
IMG-20260712-WA0016(1)
Spread the love


पुणे : भांबुर्डा वन विभाग, महा एनजीओ फेडरेशन आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील एआरएआय टेकडीवर भव्य वृक्षलागवड अभियान उत्साहात पार पडले. या उपक्रमात ३४० हून अधिक स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि विविध सामाजिक घटकांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांच्या संयुक्त सहभागातून ३ हजार देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करण्यात आली. उपक्रमासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले व वनरक्षक दयानंद आईतवाड यांनी वनविभागाच्या माध्यमातून जागेची पूर्वतयारी, खड्डे तयार करणे, मियावाकी पद्धतीसाठी माती प्रक्रिया तसेच लागवडीसाठी आवश्यक तांत्रिक उपायोजना उपलब्ध करून दिले. त्यामुळे अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकली.

या कार्यक्रमाला दयानंद आईतवाड, अनघा परांजपे पुरोहित, अमोल उंबरजे, मुकुंद शिंदे, मेघना पिंगळे, सचिन दोशी, कांचन सिधये, आकांक्षा केंभावी, वीरेंद्र बोराडे, वैभव मोगरेकर, अपूर्वा कारवा, कोमल गांधी, हर्षित घेहलोट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक समावेशकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात मतिमंद, अनाथ, वयोवृद्ध, युवक, विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, लहान मुले तसेच आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी एकत्र येऊन वृक्षलागवड केल्यामुळे पर्यावरण संरक्षणाबरोबरच सामाजिक ऐक्याचेही प्रभावी उदाहरण निर्माण झाले.

उपक्रमाचे संयोजक अमोल उंबरजे म्हणाले, “महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा आणि सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह च्या विश्वस्त अपूर्वा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महा एनजीओ फेडरेशन, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज आणि वन विभाग यांच्या सहकार्याने दरवर्षी अशा प्रकारचे वृक्षलागवड उपक्रम राबविण्यात येतात. समाजातील विविध संस्था आणि घटकांना एकत्र आणून वृक्षलागवडीच्या माध्यमातून शहराचे हरित क्षेत्र वाढविण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.”

या उपक्रमात व्ही. के. ग्रुप, फर्ग्युसन कॉलेज, आयजीबीसी पुणे चॅप्टर, ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्चर, नवक्षितिज, एफएसएआय, ममता फाउंडेशन, इशरे पुणे चॅप्टर, ज्ञानप्रबोधिनीचे अटल सामाजिक नवोन्मेष केंद्र, एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन, जिनस्पोर्ट, रिझिलियंट, जिनओम्बिओ, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशन, सूर्यदत्ता कॉलेज आणि बीकेपीएस कॉलेज यांसह अनेक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

वृक्षलागवडीनंतर सहभागी स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर स्वतःच्या हातांनी झाडे लावल्याचा आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. भविष्यातही अशाच व्यापक लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम अधिक मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा निर्धार अनघा परांजपे पुरोहित आणि मुकुंद शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी