June 28, 2026

जैवविघटनशील घनकचऱ्यापासून २४ तासांत सेंद्रिय खताची निर्मिती

0
IMG-20260627-WA0097
Spread the love

शाश्वत कचरा व्यवस्थापनात मोठे पाऊल, कचऱ्यापासून पर्यावरण संरक्षण आणि समृद्धीकडे वाटचाल

पुणे, दिनांक. २७, प्रतिनिधी – शहरे आणि गावांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या जैवविघटनशील घनकचऱ्याचे व्यवस्थापन सध्या मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर पेटंट प्राप्त मायक्रोब्सच्या सहायाने नियंत्रित अनएरोबिक कंपोस्टिंग (एसीसीएमए) तंत्रज्ञानाद्वारे कचऱ्यावर प्रक्रीया करणे हा त्याच्या व्यवस्थापन क्षेत्रात एक प्रभावी आणि शाश्वत पर्याय ठरला आहे. देशातील अशा प्रकारचे हे पहिलेच संशोधन आहे.

एव्हीके ग्रीन सोल्यूशन्स प्रा. लि. या पिनाक ग्रुपच्या उपकंपनीने विकसित केलेल्या अत्याधुनिक सेंद्रिय कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे आणि सस्टेरा (Susterra) प्रा. लि. च्या पर्यावरण प्रयोगशाळेचे उद्घाटन शनिवारी खासदार मेधा कुलकर्णी, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापालिकेतील विरोधीपक्षनेते नगरसेवक ॲड. नीलेश निकम, नगरसेविका मंजूषा खर्डेकर यांच्या उपस्थित करण्यात आले. पिनाक ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश चंद्रात्रे, डॉ. कीर्ती चंद्रात्रे, पर्यावरण सल्लागार मैथिली चंद्रात्रे-शेट्टी, मराठी बांधकाम व्यवसायिक संघटनेचे नितीन देशपांडे, मिलिंद देशपांडे यांच्यासह पिनाकचे पदाधिकारी नितीन नाईक, सुहास जोशी, हेमंत पिंपळे यावेळी उपस्थित होते. मैथिली यांनी या संशोधनाची पार्श्वभूमी यावेळी मांडली. अनुषा कुलकर्णी यांनी शहराचे घन घनकचरा व्यवस्थापन कसे असावे, याचे सादरीकरण केले.

जैवविघटनशील घनकचऱ्याचे सेंद्रिय खत निर्मिती यंत्र (OWC) असे या मशीनचे नाव आहे. केंद्र सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०२६ च्या निकषांची पुर्तता करणारा हा प्रकल्प आहे.

पारंपरिक कंपोस्टिंग प्रक्रियेसाठी अनेक आठवडे किंवा महिने लागतात, तर एसीसीएमए तंत्रज्ञान ही प्रक्रिया अत्यंत जलद आणि कार्यक्षम पद्धतीने २४ ते ३६ तासांत पूर्ण करते. या प्रक्रियेमुळे कचऱ्याचे उच्च-गुणवत्तेच्या सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होते. हे तंत्रज्ञान गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, उद्योग, मार्केट यार्ड, बागा, महानगरपालिका तसेच धार्मिक स्थळांमध्ये वापरता येते. मशीनद्वारे तयार होणारे सेंद्रिय खत मातीची सुपीकता वाढविण्यास मदत करते आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करते. त्यामुळे शाश्वत शेती आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळते. यानिमित्ताने निसर्गाकडून घेतलेले मूलद्रव्य पुन्हा निसर्गात परत जातात, अशी माहिती चंद्रात्रे यांनी दिली. तेजस्विनी मसूरकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

जलपर्णीपासून खताची निर्मिती –

सध्या पाषाण तलावाच्या कडेला बसविण्यात आलेल्या पाच टनाच्या ओडब्लूसी मशीनद्वारे दररोज जलपर्णीवर प्रक्रिया केली जात असून ७० किलो खत तयार होत आहे. गेल्या एक वर्षांपासून प्रायोगिक तत्त्वावर चाविल्यानंतर आम्हाला त्यात यश आले आहे, असे चंद्रात्रे यांनी सांगितले.

एसीसीएमए तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य़े –

१. जैवविघटनशील घनकचऱ्याचे २४ ते ३६ तासांत सेंद्रिय खतामध्ये रूपांतर.

२ कचऱ्याच्या प्रमाणात ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत घट.

३. दुर्गंधी मुक्त आणि कमी मनुष्यबळावर चालणारी प्रणाली

४. जमिनीचा ताण, वाहतूक खर्च आणि कार्बन उत्सर्जनात घट होते

५. सेंद्रिय कार्बन आणि सेंद्रिय पोषकतत्तांमुळे जमीनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते

६. मातीची सुपीकता वाढवून शाश्वत शेती आणि पर्यावरण संरक्षणाला मदत

७. स्वच्छ भारत व युनायटेट नेशन सस्टेनेबल गोलमध्ये देशाचा सहभाग वाढणार

मान्यवरांची भाषणे

ॲड. नीलेश निकम –

कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. परंतु आजतागायत अजूनही त्याचे योग्य उत्तर न मिळाल्याने कचऱ्याची समस्या उग्र बनली आहे. अशा परिस्थितीत एव्हीकेने सादरीकरण केल्याप्रमाणे विकेंद्रीकरण पद्धतीने शहरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी शहरात पाच ते १० टनाचे कचरा प्रक्रीया प्रकल्प निर्माण केल्यास समस्या सुटणार आहे.

माधुरी मिसाळ –

आपणच धोरण ठरविणारे असताना आजपर्यंत योग्य धोरणाच्या आभावी आपण शहराची कचरा समस्या सोडवू शकलो नाही, हे आपले अपयश आहे. आत्ताच्या कार्यप्रणालीद्वारे विकेंद्रित कचरा प्रक्रीया प्रकल्प उभे केल्यास कचरा समस्या सुटेल. त्यासाठी आपण सामुहीक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

मेधा कुलकर्णी –

केंद्र सरकार चांगले नियम बनवते मात्र त्याची अंमलबजावणी केवळ कागदोपत्री राहते. उदाहरणार्थ सोलार उर्जा, जलशुद्धीकरण याचबरोबर कचरा प्रक्रीया. शास्त्रोक्त पद्धतीने हे प्रकल्प हाताळले जात आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे. कचऱ्याचे विघटन प्रक्रीया प्रकल्पांसाठी केंद्रात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. पुणे महानगर पालिकेने प्रयत्न केल्यास शहरातील सर्व कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी निधी उपलब्ध होवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी