June 16, 2026

‘सदरा कफल्लकाचा’ गझलसंग्रहाचे प्रकाशन; ‘गझलरंग’ मुशायरा उत्साहात संपन्न

0
IMG-20260615-WA0035
Spread the love

पुणे : माई पब्लिकेशन्स आयोजित आणि सुरेश भट गझलमंच, पुणे प्रस्तुत ‘गझलरंग’ या दर्जेदार मराठी गझल मुशायऱ्याच्या निमित्ताने गझलकार सुधीर मुळीक यांच्या पहिल्या गझलसंग्रह ‘सदरा कफल्लकाचा’ चे प्रकाशन एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ,पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. साहित्यप्रेमी, गझलकार, कवी आणि रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने मराठी गझलविश्वात विशेष उत्सुकता निर्माण केली.

पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी किशोर कदम (सौमित्र) यांच्या हस्ते झाले. यावेळी उर्दू गझलकार, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि सह आयुक्त मोनिका सिंग ,दगडूदादा लोमटे (अंबेजोगाई) तसेच सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधुताई सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोनिका सिंह यांनी मनोगत व्यक्त करताना सुधीर मुळीक यांच्या गझललेखनातील सातत्य, आशयघनता आणि संवेदनशील अभिव्यक्तीचे कौतुक केले. त्यांच्या गझलांमध्ये मानवी अनुभव, सामाजिक वास्तव आणि भावनिक जाणिवांचे प्रभावी चित्रण आढळते, असे त्या म्हणाल्या. किशोर कदम यांनी कविता आणि गझल या केवळ साहित्यप्रकार नसून माणसाच्या जगण्याचा आणि भावविश्वाचा दस्तऐवज असल्याचे सांगत सुधीर मुळीक यांच्या लेखनातील प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

प्रास्ताविक करताना संपादक पूजा भडांगे म्हणाल्या, “जेव्हा भावना शब्दांना स्पर्श करतात तेव्हा कविता जन्म घेते आणि जेव्हा त्या भावना वृत्त, रदीफ आणि काफियाच्या शिस्तीतून व्यक्त होतात तेव्हा गझल आकार घेते.” सुधीर मुळीक यांच्या गझलांमध्ये मानवी भावविश्वाचे विविध पैलू प्रभावीपणे प्रतिबिंबित झाल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी माई पब्लिकेशन्स नवोदित आणि गुणवंत लेखक, कवी तसेच साहित्यिकांना प्रकाशनाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संस्था कार्यरत असून विविध साहित्यप्रकारांतील पुस्तकांचे प्रकाशन सातत्याने केले जात असल्याचे सांगण्यात आले. ममता सपकाळ यांनी साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तक प्रकाशनाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रकाशन सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या गझल मुशायऱ्यात सदानंद बेन्द्रे, सुशांत खुरसाळे, ममता सपकाळ, इंद्रजीत उगले, अज्ञातवासी आणि सुधीर मुळीक यांनी आपल्या निवडक गझला सादर केल्या. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. मराठी गझल साहित्याची समृद्ध परंपरा आणि समकालीन भावविश्वाचा सुरेख संगम या मुशायऱ्यात अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी केले, तर पूजा भडांगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी सुधीर मुळीक यांचे अभिनंदन करत त्यांच्या गझलसंग्रहाला रसिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी