पु. ल. देशपांडे उद्यानाबाहेरील अतिक्रमण, वाहतुकीची कोंडी व इतर अडचणी बाबत…
काल सायंकाळी प्रसिद्ध अश्या पु. ल. देशपांडे उद्यानात जाण्याचा योग आला. ह्या उद्यानाला शब्दश: हजारो पुणेकरांची पसंती लाभली आहे याचा प्रत्यय आला. पाच रुपये प्रवेश शुल्क व वाहनतळ शुल्क द्यायला प्रचंड गर्दी होती व हे सुंदर उद्यान नागरिकांनी आणि विशेषत: लहान मुलांनी फुलून गेले होते.
मात्र येथे आत प्रवेश करायला व बाहेर पडायला एकच प्रवेशद्वार असल्यामुळे तेथे व गर्दीच्या अश्या सिंहगड रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती व त्यात अडकून नागरिकांच्या आनंदावर विरजण पडत होते.याचे मुख्य कारण म्हणजे
मुख्य प्रवेशद्वारा लगत अगदी रस्त्यावर असलेल्या विक्रेत्यांच्या अनियंत्रित वावरामुळे. हे अनधिकृतरित्या हातगाडी सरळ उभी करून व पथारी पसरून वाहतुकीला अडथळा उत्पन्न करत होते. त्यातून आत बाहेर जायला यायला एकच प्रवेशद्वार असल्यामुळे नागरिकांच्या कोंडीत भरच पडली होती.तेथूनच उद्यान अधीक्षक मा. अशोक घोरपडे व स्थानिक नगरसेवक तसेच तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता येथे अनेकदा कारवाई करून ही परिस्थिती ” जैसे थे ” असल्याचे निदर्शनास आले. सबब याठिकाणी असणाऱ्या भेळ, पाणीपुरी सह इतर हातगाड्यांना, फुगे व तत्सम पदार्थ विक्रेत्यांना शिस्त लावणे गरजेचं असून याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना केली जावी अशी आग्रही मागणी करत आहे.बागेत येणाऱ्यांना खाद्यपदार्थ आवश्यक आहेतच, त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज उद्याना प्रमाणे आत मध्ये किंवा पदपथा लगत यांची व्यवस्था केली जावी जेणेकरून कोणाच्या पोटावर पाय येणार नाही.
तसेच in out ला स्वतंत्र द्वार दिल्यास मोठा फरक पडेल असेही वाटते.बागेसमोरच सिग्नल असून तेथून यु टर्न घेणाऱ्यांमुळे आणि सिग्नल तोडून सिंहगड रस्त्यावरून येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर पडत असल्याचेही निदर्शनास आले आहे. याबाबत देखील वाहतूक पोलिसांसमवेत पाहणी करून योग्य तोडगा काढावा अशीही मागणी करत आहे. तसेच ” कलाग्राम ” हा सुंदर प्रकल्प देखील नागरिकांना बघण्यासाठी खुला ठेवावा अशी ही विनंती करत आहे. सदर कलाग्राम हा फक्त एखाद्या उपक्रमाच्या वेळेसचं खुला असतो, मात्र सध्याच्या सुट्टीच्या काळात हा नागरिकांना बघता आल्यास योग्य होईल असं वाटते.
ता. क.- आज रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी उसळेल. अश्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी केल्यास दीर्घाकालीन उपाययोजना करण्यासाठी चे नियोजन करणे सोप्पे होईल.
आपण यथायोग्य कारवाई कराल ह्या अपेक्षेसह….
