May 16, 2026

पुणे जिल्हा नियोजन बैठकीत ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा ॲानलाईन सहभाग

0
IMG-20260515-WA0009
Spread the love

दुर्गम भागातील विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा सुरू करा!- ना. पाटील

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोथरुड येथील निवासस्थानी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होत काटकसरीचा आदर्श घालून दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला.

या माध्यमातून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, वेळेची बचत आणि अनावश्यक प्रशासकीय खर्च टाळता येतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. या बैठकीत पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांच्या अनुषंगाने आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सूचना मांडल्या.

नुकत्याच घडलेल्या नसरापूर येथील दुर्दैवी घटनेची गंभीर दखल घेत, ना. पाटील यांनी ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेवर विशेष भर दिला. दुर्गम भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी ‘सीएसआर’ निधीच्या माध्यमातून विशेष बससेवा सुरू करावी, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली.

नसरापूर सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस विभागाने व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच विकृत मानसिकता असलेल्या संशयित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल का, यावर पोलीस प्रशासनाने तातडीने विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कम्पाऊंड वॉल (संरक्षक भिंत) उभारण्यात यावी. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र ‘बचत गट मॉल’ उभारण्यात यावा. जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये हक्काची व सुसज्ज स्मशानभूमी असावी, अशा महत्वपूर्ण सूचना ही त्यांनी यावेळी केल्या.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या या डिजिटल सहभागामुळे आणि महत्त्वपूर्ण सूचनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती देतानाच, शासकीय संसाधनांचा योग्य व काटकसरीने वापर करण्याचा एक सकारात्मक संदेश प्रशासनाला मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी