-महाराष्ट्राची अर्थ आणि राजकीय व्यवस्था साखरेभोवती संघटितमाजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी : डॉ. अनिल गांधी लिखित ‘साखर गोड पण जीवघेणी’ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : महाराष्ट्राचे ८० टक्के पाणी ऊस या एका पिकाला जाते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर देखील सर्वाधिक महाराष्ट्रातच लागतात. त्यातही पुणे जिल्ह्यात टँकरची सर्वाधिक मागणी असते. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न देखील महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्राची अर्थ आणि राजकीय व्यवस्था साखरेभोवती संघटित आहे. सर्वाधिक सिंचन प्रकल्प पुणे जिल्ह्यात आहेत. ऊस या एका पिकाभोवती अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. आणि या गोष्टी इतक्या गुंतलेल्या आहेत की, एक साखर कारखाना म्हणजे दोन आमदार अशी परिस्थिती आहे, असे मत माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
सर्जन डॉ. अनिल गांधी लिखित ‘साखर गोड पण जीवघेणी’ या आरोग्य विषयक पुस्तकाचे प्रकाशन टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शैलेश गुजर, लेखक सर्जन डॉ. अनिल गांधी, पुस्तकाच्या संपादिका डॉ. हेमलता पिसाळ, सॅम पब्लिकेशन कोल्हापूर चे अनिल मेहता, उपस्थित होते.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, जीडीपी मोजताना माणूस आनंदी झाला का, हे मोजले पाहिजे. ग्रंथव्यवहार हा समाजाच्या प्रगल्भतेचे मूळ लक्षण आहे. जीडीपी महत्त्वाचा आहेच; परंतु बौद्धिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या समाज किती श्रीमंत आणि आरोग्य पुर्ण आहे, हे महत्त्वाचे आहे.
डॉ. शैलेश गुजर म्हणाले, पूर्वी गोड खाण्याचा बेत असायचा; परंतु आता गोड खाणे जीवावर बेतत आहे. शरीराला साखर आवश्यक पण अतिवापर घातकच आहे. साखर शरीरासाठी आवश्यक असते; परंतु किती प्रमाणात आवश्यक आहे हे समजून घेतले पाहिजे. पहिली ते दहावीच्या पुस्तकात कुठेही साखर व वापर याबाबत उल्लेख नाही. साखर प्रमाणीकरण देखील कोणत्याही पाकीटवर आपल्याला दिसत नाही. त्याचे घातक परिणाम देखील दिले पाहिजेत. देशात ९% लोक मधुमेह ग्रस्त आहेत. जगात भारत ही मधुमेहाची राजधानी आहे.
लेखक सर्जन डॅा अनिल गांधी म्हणाले, समाजात व्यक्तीला रोगमुक्ती पेक्षा रोग होणार नाही यांचे प्रशिक्षण देण्या करिता मी पुस्तके लिहीली आहेत. शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी साखर कमी प्रमाणात वापरली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. समीर गांधी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हेमलता पिसाळ यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.
- फोटो ओळ : सर्जन डॉ. अनिल गांधी लिखित ‘साखर गोड पण जीवघेणी’ या आरोग्य विषयक पुस्तकाचे प्रकाशन टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झाले. यावेळी उपस्थित मान्यवर.
