माजी सरन्यायाधीश उदय लळीत, अभिनेते अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्कार
- सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा; शनिवारी (दि. ७) होणार वितरण
– पद्मश्री प. पू. डॉ. चंदनाजी महाराज यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड २०२६’
पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित करण्यात आले आहेत. येत्या शनिवारी (दि. ७) सायंकाळी ५.३० वाजता बंटारा भवन, बाणेर, मुंबई-पुणे महामार्ग येथे हे पुरस्कार सन्मानपूर्वक वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, जनसंपर्क व्यवस्थापिका स्वप्नाली कोगजे, सल्लागार समिती सदस्य जीवराज चोले आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळित यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे आदी उपस्थित राहणार आहेत.”
पद्मश्री परमपूज्य आचार्य डॉ. चंदनाजी महाराज (ताई माँ) यांना ‘सूर्यदत्त ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड २०२६’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ यंदा माजी सरन्यायाधीश उदय लळित, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, हास्ययोग चळवळीचे विठ्ठल काटे, माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड, अभिनेते राकेश बेदी, बांधकाम व्यावसायिक विलासकुमार पालरेषा, दिग्दर्शक सुभाष सेहगल, शिक्षणतज्ज्ञ अशोककुमार ठाकूर, शास्त्रज्ञ डॉ. आनंद भाडळकर, विधिज्ञ ऍड. प्रमोद आडकर, साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया, उद्योजक प्रकाश गांधी, जागतिक रणनीतीकर संजय पुरी यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, योगसद्गुरू डॉ. कृष्णदेव गिरी, अभिनेत्री व स्टँडअप कॉमेडियन उपासना सिंग, भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍड. आशुतोष श्रीवास्तव, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुरेंद्रा कुमारी, योग प्रशिक्षक राखी गुगळे, अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कनक सहा, बासरीवादक पारस नाथ, ग्लोबल युथ अँबेसेडर दारासिंग खुराणा, डॉ. प्रमोद त्रिपाठी, गिर्यारोहक आशिष माने यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’, तर सीए मोहित धांड, गायिका प्रीती दवे व पिंकी दवे, जलतरणपटू हातवी शहा यांना ‘सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड’, तर मास्टर ऋषी शिव प्रसन्न आणि मास्टर राघव मालपाणी यांना ‘सूर्यदत्त लिट्ल मास्टर नॅशनल अवॉर्ड’ देण्यात येणार आहे.
