वास्तुशास्त्राच्या सखोल अभ्यासाची गरज : ज्येष्ठ वास्तुगुरु नरेंद्र सहस्त्रबुद्धेज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्राचा पंचम पदवी प्रदान व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न ; कै. डॉ. धुंडीराज पाठक गुरुजी स्मृतीदिनानिमित्त गौरव
पुणे : आज समाजात दररोज आत्महत्या, अपघात यांसारख्या दुर्दैवी घटनांच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. अशा घटनांशी संबंधित वास्तूंचा अभ्यास जर वास्तुशास्त्राच्या माध्यमातून केला, तर त्या घटनांच्या कारणांचा वेध घेता येऊ शकतो. त्यामुळे आजच्या काळात वास्तुशास्त्राचा अधिक सखोल अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वास्तुगुरु नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी केले.
ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने विणकर सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पंचम पदवी प्रदान व पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना त्यांच्या उल्लेखनीय लेखन कार्यासाठी शारदा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याचे उद्घाटन हैदराबादचे ज्येष्ठ ज्योतिर्विद भाऊसाहेब रंगनाथ कुलकर्णी यांच्या शुभहस्ते झाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती उमेश कुलकर्णी गुरुजी, जितेंद्र ओमप्रकाश भट्टड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. ज्येष्ठ वास्तु अभ्यासक डॉ. दिलीप नेमीचंद नहार यांना रत्नमाला पुरस्कार, ज्येष्ठ वास्तुगुरु नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांना त्यांच्या उल्लेखनीय लेखनासाठी शारदा पुरस्कार, वीरवाडी (नसरापूर) येथील अम्नाय वाटिका वेद पाठशाळेचे संस्थापक व प्रमुख आचार्य वेदमूर्ती घनपाठी गोपाळ भुजंग जोशी गुरुजी यांना वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार, वेदमूर्ती वैभव कुलकर्णी गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार, तसेच ज्येष्ठ ज्योतिर्विद व प्रख्यात ज्योतिष अभ्यासक वि. श. अष्टेकर गुरुजी यांना ज्योतिष रत्नकार गुरु कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश कुलकर्णी गुरुजी म्हणाले, महान ऋषींनी दिलेले वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र हे गुरु परंपरेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले आहे. ही शास्त्रे मानवाला मिळालेली अमूल्य देणगी असून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या आणि समाजाची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्ती दूर करून समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणे आवश्यक आहे.
या वेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांकडून त्यांनी विशेष शपथ घेतली की, ते या शास्त्रांचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठीच करतील, कोणालाही कोणत्याही परिस्थितीत फसवणार नाहीत, भीती दाखवून लूटमार करणार नाहीत आणि शक्य तितक्या प्रमाणात या शास्त्रांच्या माध्यमातून लोकसेवा करतील.
डॉ. दिलीप नहार म्हणाले, रत्नमाला पुरस्कार मातोश्रींच्या नावाने मिळाल्याने मला विशेष आनंद झाला आहे. हा माझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. वास्तुशास्त्रातील प्राचीन सूत्रांचा आणि आजच्या काळातील त्याच्या परिणामांचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे.
वेदमूर्ती वैभव कुलकर्णी गुरुजी म्हणाले, वास्तुशास्त्र हे वेद अभ्यासाचे डोळे आहे. या शास्त्राच्या माध्यमातून जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. वेदमूर्ती गोपाळ भुजंग जोशी गुरुजी म्हणाले, वेदशास्त्रात ज्योतिषशास्त्राचे स्थान सर्वोच्च आहे. माझ्या आई-वडिलांनी लहानपणीच मला या शास्त्राच्या अभ्यासाची प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज या क्षेत्रात कार्यरत आहे.
या सोहळ्यात वास्तुविशारद, अंक विशारद, वास्तु भूषण, वास्तुरत्न तसेच वैदिक टॅरो रीडर या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. महाराष्ट्रासह देश-विदेशातून आलेल्या विविध वयोगटांतील सुमारे १५० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली. याच वेळी वास्तुशास्त्रातील गुरुवर्य कै. डॉ. धुंडीराज पाठक गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष श्रद्धांजली व स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश धूरत व डॉ.विकास पाटील यांनी केले.
- फोटो ओळ : ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने विणकर सभागृह येथे पंचम पदवी प्रदान व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर व पुरस्कारार्थी.
