February 15, 2026

ब्रह्मोत्सवात ३०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती

0
IMG-20260131-WA0018
Spread the love


श्री महालक्ष्मी मंदिराच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन

पुणे : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्यातील ३०० हून अधिक गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली. ब्रम्होत्सवाच्या निमित्ताने मंंदिरावर फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

यावेळी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, मनिषा चोरबेले, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते. उत्सवाचा प्रारंभ मंदिरात गरुड स्थापना, कलश स्थापना व यज्ञ स्थापना करुन झाला.

शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत पुण्यातील हुजूरपागा मुलींची शाळा, रेणुका स्वरूप मुलींची शाळा, विद्या विकास विद्यालय प्रशाला, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता, मॉडर्न हायस्कूल, अहिल्यादेवी मुलींची शाळा, विमलाबाई गरवारे हायस्कूल या शाळांमधील ३०० हून अधिक गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.

श्रीनाथ भिमाले म्हणाले, तुम्ही मनातून ठरवले, तर अनेक गोष्टी साकार करू शकता; मात्र त्या साकार करण्याची जिद्द मनात असली पाहिजे. ज्याच्याकडे कला असते, ती लपत नाही; परंतु त्या कलेला योग्य दिशा मिळाली, तर ती आणखी फुलते. होतकरू व गुणवंत मुलांना आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी महालक्ष्मी मंदिर पुढाकार घेत आहे. आजचे तरुण हे उद्याच्या भारताचे भविष्य आहेत आणि या भविष्याला योग्य मार्गदर्शन करण्याचे काम महालक्ष्मी मंदिरसारखी संस्था करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

मनिषा चोरबेले म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी नेहमी स्वप्ने पाहावीत; मात्र ती स्वप्ने साकार करण्याची जिद्दही मनात बाळगली पाहिजे. जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता तुमच्यात असेल, तर सारसबाग महालक्ष्मी ट्रस्टसारख्या संस्था नक्कीच तुम्हाला मदत करतील. आजच्या काळात स्वप्ने पाहण्यासाठी पैसे नव्हे, तर कष्ट, मेहनत आणि जिद्द आवश्यक आहेत; ही गुणवैशिष्ट्ये बाळगली, तर स्वप्ने नक्कीच साकार होतील, असेही त्यांनी सांगितले.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, अनेक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीला सामोरे जात शिक्षण घेत असतात. आजची पिढी ही उद्याचे भविष्य आहे. हे राष्ट्राचे भविष्य चांगले घडावे म्हणून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यात कोणती अडचण येऊ नये म्हणून ट्रस्टच्या वतीने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत विविध समाज उपयोगी उपक्रम देखील राबविले जातात. तुम्ही कितीही मोठे झालात तरी शाळेबद्दल नेहमी मनात आदर ठेवा कारण इथूनच तुम्ही घडता, असेही त्यांनी सांगितले

रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता १०८ कलश अभिषेक होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली व श्री विष्णू या उत्सवमूर्तींची धान्य तुला होणार असून आदिवासी भागांत हे धान्य देण्यात येणार आहे. रात्री ८.३० वाजता सुवर्ण कमल आणि रजत कमल अर्चना म्हणजेच उत्सवमूर्तींना सोन्याची व चांदीची फुले अर्पण करण्यात येतील.

उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता केशर दूध अभिषेक, सायंकाळी ७ वाजता पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देवीच्या उत्सवमूर्तींची पालखी प्रदक्षिणा मंदिर परिसरात होणार आहे. तर, सायंकाळी ७.३० वाजता पुष्पउत्सव म्हणजेच फुलांची होळी होणार आहे. सर्व कार्यक्रमांमध्ये पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

  • फोटो ओळ : श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पुण्यातील ३०० हून अधिक गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी