मनोहारी नृत्याविष्काराने रंगले कथकचे ‘आवर्तन’गुरु पं. राजेंद्र गंगाणी यांच्या उपस्थितीत १७० कथक नृत्यांगनांचे सादरीकरण’लयोम इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स’च्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन

पुणे: चेहऱ्यावरील उत्कट भावमुद्रा… कलात्मक व लयबद्ध हालचाली… घुंगरांचा तालबद्ध नाद… अशा मनोहारी नृत्याविष्काराने कथकचे ‘आवर्तन’ रंगले. निमित्त होते, कथक नृत्याविष्काराची अनुभूती देणाऱ्या, ताल, लय व भाव यांचा मोहक संगम असलेल्या ‘आवर्तन २०२५’ कार्यक्रमाचे! कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
कथक नृत्यांगना वेदांती भागवत महाडिक यांच्या ‘लयोम इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड मीडिया’च्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त या नेत्रदीपक व हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कथक गुरु पं. राजेंद्र गंगाणी यांच्या उपस्थितीत १७० कथक नृत्यांगनांनी नृत्याविष्कार सादर केले. लहानग्यांनी ‘मैत्री असावी अशी’ या कवितेवर सादर केलेले कोमल, उमलत्या पदन्यासांचे नृत्य विशेष दाद मिळवून गेले. राग बिहाग, बागेश्री आदींच्या आल्हाददायक सुरावटींवर ‘गुरु वंदना’, ‘गगन सदन’, ‘रसिले रंगीले’, ‘निज रे’, ‘दशावतार’ यांसारख्या नृत्यरचना सादर होताच सभागृह मंत्रमुग्ध झाले.
वेदांती भागवत महाडिक यांच्यासह त्यांच्या शिष्यांनी वैविध्यपूर्ण नृत्यरचना सादर करीत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. शास्त्रीय बंदिशी, शिववंदना, गणेशवंदना, धृपद, चतुरंग, त्रिवट तराणा, तसेच तीनताल यासारख्या विविध अंगांचे सादरीकरण झाले. प्रत्येक नृत्यरचना ताल-लयबद्ध पावले, ठेक्यांची नजाकत आणि भावनांची अभिव्यक्ती यामुळे उठून दिसली. या सर्जनशील रचनांमधून प्रेक्षकांना कथकनृत्याची विविध रूपे अनुभवायला मिळाली. अभिजित पाटसकर (संवादिनी), सुनील अवचट (बासरी), मयूर महाजन (गायन), मुक्ता जोशी (गायन), यश सोमण (तबला) आणि अपूर्व द्रविड (पखवाज) यांनी साथसंगत केली.
पं. राजेंद्र गंगाणी यांनी नृत्यांगनांच्या मेहनतीचे कौतुक केले. “इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी एकाच मंचावर कथकातील अंगांचा सुसंवाद साधून नृत्य सादर करणे अद्वितीय आहे. लयोम इन्स्टिट्यूटने पुण्यात कथक संवर्धनासाठी केलेले कार्य अभिमानास्पद आहे. तरुणाईला शास्त्रीय कलेशी जोडण्याचा प्रयत्न यातून होतो आहे, हे भविष्याच्या दृष्टीने आनंददायी आहे,” असे त्यांनी नमूद केले.
संस्थेच्या मागील १५ वर्षांत चार विद्यार्थिनींना केंद्र सरकारकडून ‘सीसीआरटी’ शिष्यवृत्ती मिळाली असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांत पारितोषिके मिळाल्याचे वेदांती भागवत महाडिक यांनी सांगितले. अक्षय महाडिक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.आणि प्रशांत कात्यायन यांनी निवेदन केले