गुडविल’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज (दि.२४)मोरे वेल्फेअर ट्रस्टच्या गुडविल इंडिया उपक्रमातर्फे आयोजन : राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांची उपस्थिती

पुणे : मोरे वेल्फेअर ट्रस्टच्या गुडविल इंडिया उपक्रमाच्या वतीने ‘गुडविल- लोकांनी लोकांसाठी चालवलेला सामाजिक उपक्रम’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार आहे, अशी माहिती गुडविल इंडियाचे अध्यक्ष कालिदास मोरे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून राज्यसभेच्या खासदार संसदरत्न डॉ. मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. माजी खासदार अशोक मोहोळ, एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) , ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, यांसह युनिव्हर्सल समूहाचे रोहिदास मोरे, उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी, लेखक प्रसाद घारे उपस्थित राहणार आहेत.
मोरे वेल्फेअर ट्रस्टचा गुडविल इंडिया उपक्रम हा लोकांनी लोकांसाठी चालवलेला सामाजिक उपक्रम आहे. सोसायट्यांमधून जुने कपडे संकलित करून ते धुऊन, इस्त्री करून, कमी दरात विक्री केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिले जातात. गरीब व गरजूंना अल्प किमतीत कपडे मिळावेत हा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी देण्यात आली. एकाच वेळी २ लाख ९३ हजार कपडे गोळा करून वर्ल्ड रेकॉर्ड देखील संस्थेने केला आहे.
पूरग्रस्त व आदिवासी भागांमध्ये मोफत कपड्यांचे वाटप करून सामाजिक जबाबदारी पार पाडली. पूरग्रस्त आणि आदिवासींनाही मदत, गरीबांना अल्प किमतीत वस्त्र पुरविण्याचा वसा गुडविल इंडियाने घेतला आणि त्याचबरोबर विविध आपत्तीकालीन वेळी मदतीचा हात दिला. स्वस्तभोजन योजना, कोरोना काळात लोकांना मदत, कन्यारत्न विवाह मदत योजना देखील संस्थेने राबविल्या आहेत.