प्रती,मा. नवलकिशोर राम,आयुक्त, पुणे मनपा.सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारित आदेशानुसार आक्रमक श्वानांवर कारवाई करणेबाबत…

मा. महोदय,
सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारित आदेशाचे मी त्रस्त झालेल्या सामान्य नागरिकांच्या वतीने स्वागत करतो.
ह्या बाबतीत पुणे मनपा ने देखील सर्वोच्च आदेशाचा अभ्यास करून योग्य प्रतिबंधात्मक पावले उचलावीत अशी मागणी करत आहे.
1) यात प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस झुंडीने फिरणाऱ्या आणि दुचाकीस्वारांच्या व इतर नागरिकांच्या मागे लागणाऱ्या व त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या भटक्या श्वानांवर कारवाई करण्यात यावी.
तसेच पहाटे फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसह सामान्यांच्या मागे लागणाऱ्यांवरही न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार कारवाई करण्यात यावी.
2) शहरात दररोज सुमारे 80 नागरिकांना श्वानदंश च्या महाभयंकर त्रासाला सामोरे जावे लागते अशी आपलीच (मनपाची ) आकडेवारी सांगते. अश्या श्वानांना त्वरित जेरबंद करून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्याची व्यवस्था करावी.
3) प्राणीप्रेमातून, भूतदयेतून रस्त्यावर खाऊ घालणाऱ्यांवर देखील यापुढे दंडात्मक कारवाई करण्यात यावी. 4) रस्त्यावर प्राणीप्रेम दर्शविणाऱ्या आणि इतर नागरिकांना होणाऱ्या त्रासाची पर्वा न करणाऱ्यांना भटकी कुत्री भेट देऊन त्यांचे संगोपन करून पुण्य पदरात पाडून घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
5) न्यायालयाच्या निर्देशांनुसार विविध भागात श्वानांना खाऊ घालण्यासाठी ची जागा निश्चित करताना त्याचा सामान्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
6) श्वानांच्या नसबंदी साठी ची प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे व ज्या संस्थेला हे काम सोपविले आहे त्यांनी दरमहा नसबंदी केलेल्या श्वानांची व ज्या भागातील श्वानांवर नसबंदी प्रक्रिया केली त्याची माहिती जाहीर करावी, तसेच त्यांच्या गळ्यात ठळकपणे दिसतील अश्या लाल वा अन्य रंगाच्या पट्ट्या घालव्यात अशीही मागणी करत आहे.
आता मनुष्य जीव महत्वाचा की श्वान प्रेम महत्वाचे हे ठरविण्याची वेळ आली आहे आणि प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार सर्वोच्च आदेशाने कारवाई बाबतीत स्पष्टता झाली आहे.
माननीय न्यायमूर्तीनी ह्या विषयात देशातील सर्वच राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना पक्षकार करण्याचा देखील आदेश दिला आहे.याबाबत ची भूमिका मांडताना भटक्या, रेबीज झालेल्या आणि आक्रमक श्वानांमुळे होणाऱ्या त्रासाची माहिती राज्य शासनामार्फत सादर करावी अशी आग्रही मागणी करत आहे. ह्या श्वानांच्या चावण्याने किती मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक बाधित झालेत याचीही आकडेवारी सादर करावी अशीही मागणी करत आहे.