गणेशोत्सवावरील कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयात बाजू मांडूउपमुख्यमंत्री अजित पवार ; राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पिंपरी चिंचवड विभाग पारितोषिक वितरण समारंभ
पुणे: सण उत्सव साजरे करत असताना ध्वनिक्षेपक किंवा इतर अनुषंगाने न्यायालयाने कालमर्यादेबाबत बंधने घातलेली असून त्यातील काही दिवस ठरावीक मर्यादेची शिथिलता देण्यात येते. त्यापैकी अधिकाधिक दिवस गणेशोत्सवासाठी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच गणेशोत्सव साजरा करत असताना कालमर्यादेची बंधने शिथिल व्हावीत यासाठी न्यायालयामध्ये बाजू मांडण्याचे काम करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पिंपरी चिंचवड विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे पार पडला. यावेळी आमदार शंकर जगताप, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पिंपरी चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे समन्वयक विलास कामठे, बापूसाहेब धमाले, कैलास भांबुर्डेकर आदी उपस्थित होते.
थेरगाव येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर, भोसरीतील कै.दामू शेठ गव्हाणे मित्र मंडळाने द्वितीय, वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी मित्र मंडळाने तृतीय, आकुर्डीतील भैरवनाथ मित्र मंडळाने चौथे तर पिंपळे गुरव येथील भैरवनाथ तरुण मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. स्पर्धेत सहभागी झालेल्या २६० मंडळांपैकी बक्षिसपात्र मंडळे ९६ यांसह सोसायटी व शाळांचा सहभाग होता. विजेत्यांना एकूण १३ लाख ८६ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
अजित पवार म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हे समाजसेवेचे शक्तिकेंद्र आहे. लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला हा गणेशोत्सव जगातील पावणेदोनशे देशात साजरा केला जातो. जगामध्ये गेलेले भारतीय गणेशोत्सव साजरे करत असतात. नवी पिढीदेखील या उत्सवात मनापासून काम करत असते. आपली भारतीय संस्कृती, परंपरा, सण हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आहेत. सर्वांमध्ये आपलेपणा, एकोपा निर्माण करणारे आहेत. त्यातून अनेकांना सामाजिक क्षेत्रात संधी मिळत असते, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, आपली भूमी साधू, संतांची, वारकऱ्यांची असून कोणतेही गालबोट न लागता उत्सवा साजरा केला जावा. हे करत असताना सामाजिक भान देखील ठेवले पाहिजे. निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. आगामी गणेशोत्सव सामाजिक सलोखा राखून, पर्यावरण पूरक साजरा करावा. पर्यावरण संरक्षणासाठी गणेश विसर्जन कृत्रिम हौदात केले जावे, अशी भूमिकादेखील त्यांनी मांडली. गणेशोत्सव कालावधीत मेट्रो सेवा रात्री उशीरापर्यंत व पहाटे लवकर सुरू व्हावी ही मागणी पाहता तशा सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
आमदार शंकर जगताप म्हणाले, समाजाची एकरुपता गणेशोत्सवातून दिसून येते. सर्व जाती, धर्म, पंथातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव मंडळांनी चांगल्या प्रकारचे सार्वजनिक उपक्रम राबवून समाजात एकोपा रहावा यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने प्रास्ताविकात म्हणाले, सन १८९३ साली लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. समाज संघटित करण्याचे कार्य या उत्सवातून होत आहे. यावर्षी सुमारे २६० मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यापैकी ९६ मंडळे बक्षिसासाठी पात्र ठरली. गणेशोत्सव हा राज्य उत्सव व्हावा या विधानमंडळात मांडलेल्या भूमिकेला यश आले. गणेश मंडळांमार्फत वर्षभर समाजोपयोगी काम होत असते. हा उत्सव निर्बंधमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न व्हावेत. उत्सवादरम्यान कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत यासाठी गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
- फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२४ पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्र विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह येथे पार पडला. स्पर्धेत थेरगाव येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी तरुण मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी उपस्थित विजेता संघ आणि मान्यवर.
