संविधान हत्या करून लोकशाही गळचेपी करणारा आणीबाणीचा काळ _ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ

पुणे, प्रतिनिधी _
स्वातंत्र्या नंतर सर्वात काळा दिवस हा आणीबाणीचा आहे. संविधान हत्या करून लोकशाहीची गळचेपी करण्यात आली तो हा दिवस आहे. इंदिरा गांधी यांनी बांगलादेशला स्वातंत्र दिल्याने त्यांना मोठा सन्मान मिळाला पण ते युद्ध संपल्यावर सन १९७१ मध्ये मुदतपूर्व निवडणूक घेऊन बहुमताने त्या निवडून आल्या. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि पूर्ण बहुमत पूर्ण भ्रष्ट करते.परिणामी एकहाती सत्ता मिळाल्याने भ्रष्टाचार देखील वाढत गेला. देशात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झाल्याने केंद्र सरकारला जनतेकडून आव्हान दिले जाऊ लागले आणि सत्याग्रह सुरू झाल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांनी व्यक्त केले.
भाजप पुणे शहराच्या वतीने आणीबाणीस ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “आणीबाणी काळा दिवस” कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, बिनवेवाडी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर ,नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी खासदार प्रदीप रावत ,माजी खासदार अनिल शिरोळे ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मा. रवींद्र वंजारवाडकर , खासदार मेधा कुलकर्णी,भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे ,आमदार भीमराव तापकीर ,आमदार हेमंत रासने , आमदार योगेश टिळेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे , सत्याग्रही श्रीधरपंत फडके ,माजी आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते. याप्रसंगी आणीबाणी मध्ये शिक्षा भोगलेल्या ३०० पेक्षा अधिक जणांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.अनुपमा लिमये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
हिरेमठ म्हणाले, इंदिरा गांधी यांनी भ्रष्ट मार्गाने सत्ता मिळवली हे न्यायालयात सिद्ध झाले आणि त्यांचे पद देखील धोक्यात आले. त्यामुळे त्यांची सत्ता सोडायची तयारी नसल्याने तशा हालचाली सुरू केल्या . त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागू नये म्हणून त्यांनी आणीबाणीचा प्रस्ताव आणून तो तातडीने राष्ट्रपतींकडे पाठवून त्याच रात्री मंजूर करून घेतला. त्यानंतर “मिसा ” कायद्यानुसार ठिकठिकाणी अटक सत्र सुरू झाले. कोणाला कधी ही विना वॉरंट अटक केली जाऊ लागली, त्यांना तक्रार, अपील करण्याचा अधिकार राहिला नाही आणि अनेक दिवस लोकांना कारागृहात पाठवले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील बंदी आणून अटक सुरू झाली. त्यावेळी लोकसंघर्ष समिती स्थापन करून त्या माध्यमातून भूमिगत काम मोठ्या प्रमाणात सुरू झाले.भूमिगत आंदोलना मध्ये मातृ शक्तीचा देखील मोठा सहभाग होता.सर्व वृत्तपत्रावर बंदी आणली गेली, कोणत्या गोष्टी छापायच्या त्यावर बंधने आणली गेली. समाजातील असंतोष प्रकट करण्यासाठी सत्याग्रह जागोजागी सुरू झाले. प्रसिद्धी मर्यादा असल्याने समाजापर्यंत सत्याग्रह पोहचविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्यात आला. १४ नोव्हेंबर रोजी पंडित नेहरू यांच्या समाधीस हार घालण्यासाठी इंदिरा गांधी आल्या असताना ५० ते ६० जनांनी आणीबाणी विरोधात घोषणाबाजी केल्याने त्यांना अटक करण्यात आली.अशाचप्रकारे विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. सत्याग्रहिंचा अमानुष छळ करण्यात आला. ब्रिटिश काळात इंग्रजांनी स्वातंत्र्यसेनानींचा छळ केला नसेल तेवढा आणीबाणी काळात आंदोलकांचा केला गेला असे निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवले. विदेशात देखील आणीबाणी विरोधात प्रचाराचे काम मोठ्या प्रमाणात झाले. गुप्तचर यंत्रणांना देखील याची माहिती नव्हती. इंदिरा गांधींनी २१ जानेवारीला निवडणुकीची घोषणा केल्यावर विरोधक एकत्र आले आणि जनता पार्टी स्थापन करण्यात आली. प्रचारास अभूतपूर्व प्रतिसाद मिळू लागला आणि इंदिरा गांधी यांना धोका दिसून आला. जनता पक्ष २/३ बहुमताने निवडून आला आणि अनेक दिग्गजांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. इंदिरा गांधी यांचा देखील पराभव होऊन जनता पक्ष सत्तेत आला.
जावडेकर म्हणाले, “आणीबाणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मध्ये प्रचारक होते. तेथे त्यांनी भूमिगत राहून काम केले. त्या वेळी जे कष्ट स्वयंसेवकांनी केले त्यामुळेच आपण आजचे वैभव अनुभवतोय. त्याचा वापर जनकल्याणासाठीच करायचा. संविधानावर सध्या चर्चा आहे. घटनेची पायमल्ली केल्याचा आरोप आपल्यावर करतात. पण घटना मोडली खुर्ची वाचवायला ती इंदिरा गांधी काँग्रेसनेच. सर्व स्वातंत्र्य हिरावले. कोणालाही पंतप्रधान करता आलं असतं. पण आपल्या परिवारासाठीच सर्व काही हवे. दीडशे वर्ष लढा सर्वांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्याचे फळ संविधान होते. मात्र, त्याची पायमल्ली काँग्रेसनेच केली. घटना वाचविण्याचे श्रेय विरोधी पक्ष व मोठ्या प्रमाणात रा. स्व. संघाचे विचार परिवाराला जाते.”
घाटे म्हणाले, आणीबाणीला ५० वर्ष झाल्याबद्दल ज्यांनी आणीबाणी मध्ये सहभाग घेऊन सत्याग्रह केला, कारागृहात शिक्षा भोगावी लागली, आणि ज्यांच्या त्यागामुळे बाबासाहेबांची घटना अबाधित ठेवली त्यांचा सन्मान आज करण्यात येत आहे. आणीबाणीचा विषय नवीन पिढी समोर मांडला जावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याकाळात आपण देशातील भ्रष्ट आणि हुकूमशाही सरकार विरुद्ध जी चळवळ उभी केली त्याबाबत आज आठवण करण्याचा दिवस आहे.