गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी पुणेकरांतर्फे डिजिटल लायब्ररी

जनहित चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार ; ई लर्निंग सेट सह विविध पुस्तकांची भेट
पुणे : गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागात कायमचा शिक्षकांची उणीव भासते. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हीच उणीव दूर करीत पुणेकरांतर्फे गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररी देण्यात आली. यामध्ये दोन शाळांना शैक्षणिक ऍप अपलोड केलेले ई लर्निंग सेट आणि लायब्ररीसाठी विविध पुस्तकांची भेट देण्यात आली.
जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती, पुणे च्या पुढाकाराने सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळ येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, ट्रस्टचे प्रकाश ढमढेरे, शिरीष मोहिते, उदय जगताप, पियुष विजय शहा, निलेश खाणेकर, अनिल ढमढेरे, वसंत खुटवड, हेमंत तिरळे, रोहन जाधव, शंतनू मुक्कावार, ओंकार ठाकूर आदी उपस्थित होते.
संस्थेतर्फे पाच गो शाळांना सकस आहार देखील प्रदान करण्यात आला. यावेळी मिलिंद एकबोटे, फार्मडीलचे संदीप शहा, कवाड परिवार, गणेश सातपुते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ सारसबाग यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश ढमढेरे व उत्सव समितीचे अध्यक्ष पियुष विजय शहा यांनी संयोजन केले.
डॉ. पराग काळकर म्हणाले, अजूनही भारतात असे अनेक भाग आहेत, जिथे आपण शिक्षणाच्या माध्यमातून पोहोचलेलो नाही. मात्र, अशा ठिकाणी पुस्तके वाचून चांगले विचार पोहोचतील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात २०२५ पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. अजूनही अनेकांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे आहे, राष्ट्रभक्ती निर्माण करणारी भावना देखील यामाध्यमातून रुजवायची आहे.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, पुढील थोड्याच दिवसात नक्षलवादाचे उच्चाटन होईल, असा विश्वास आहे. मात्र, त्यावेळीच आपल्या आदिवासी बांधवांना राष्ट्राच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करावे लागणार आहे. राष्ट्र पुरुषांकडून प्रेरणा घेण्याकरिता जयंती सारखे उत्सव साजरे करायला हवे.
उदय जगताप म्हणाले, नवी पिढी पुस्तक वाचनाकडे वळत नाहीत, हे आपण पाहतो. गडचिरोलीमध्ये पुस्तक संस्कृती रुजविणे, ही काळाची गरज आहे. अनेक चांगले प्रयोग त्या भागात केले आहेत. यामुळे तेथील परिस्थिती चांगल्या पद्धतीने बदलली आहे, हे पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचे व पुणेकरांचे यश आहे, असेही त्यांनी सांगितले.
- फोटो ओळ : जनहित चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्सव समिती, पुणे च्या पुढाकाराने सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधन मंडळ येथे आयोजित कार्यक्रमात गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररी देण्यात आली. यामध्ये दोन शाळांना शैक्षणिक ऍप अपलोड केलेले ई लर्निंग सेट आणि लायब्ररीसाठी विविध पुस्तकांची भेट देण्यात आली.