प्रत्येक कर्म भगवंताशी जोडणे म्हणजे कर्मयोगप.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने ‘श्री गणेश गीतेतील कर्मयोग’ या विषयावर निरूपणमालेचे चौथे पुष्प

पुणे : आपली इच्छा असो किंवा नसो, कर्म तर करावेच लागतात. कर्म ही अनिवार्य गोष्ट आहे. कोणतेही कर्म केले नाही, तरी श्वास घेणे आणि श्वास सोडणे, हे कर्म तर करावेच लागते. प्रत्येक कर्म भगवंताशी जोडणे म्हणजे कर्मयोग आहे, असे यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ‘श्री गणेश गीतेतील कर्मयोग’ या विषयावरील निरूपणमालेचे आयोजन श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. निरूपणमालेच्या चौथ्या पुष्पात ते बोलत होते. ट्रस्टच्या यु ट्यूब आणि फेसबुक चॅनेल वर ही निरूपणमाला गणेशभक्तांना अनुभवण्यास मिळत आहे.
प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज म्हणाले, सर्व संतांनी आपल्याला सांगितले आहे की नाम हे श्वासावर बसवायचे. आपण कोणतेच बाहेरच कर्म करीत नसलो, तरी श्वासासोबत नाम घेण्याचे कर्म करता येते. इतर प्राण्यांचे कर्म हे बुद्धी शिवाय आहे. परिवर्तन नावाची गोष्ट कोणत्याही इतर जीवाला करता येत नाही. परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कर्मयोगाचा विचार मनुष्य करीत असतो.
ते पुढे म्हणाले, कर्म फळाची इच्छा आपण सोडायची आहे. कर्म करीत राहावे लागणार आहे. कर्मफळाची इच्छा का सोडायची, हे समजून घेणे आवश्यक आहे. जर टी इच्छा ठेवली, तर इच्छापूर्ती झाली तर अहंकार वाढतो किंवा अपूर्ती राहिली तर क्रोध वाढतो. त्यामुळे दोन्हीकडून तोटाच आहे. परमेश्वर करतो, हा विश्वास बसला, तर आनंद मिळवता येऊ शकतो. प्रत्येक कृतीतून आनंद मिळविणे हाच उद्देश असायला हवा.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, श्री गणेश नामाचा महिमा अद्वितीय आणि अगाध आहे. नाममहात्म्यानंतरचा पुढील टप्पा श्री गणेश गीतेतील कर्मयोग हा असून याविषयावरील निरूपणमालेतून गणेशभक्तांसमोर कर्मयोग उलगडण्यात येत आहे. दिनांक २४ मे पर्यंत दररोज सायंकाळी ६.३० ते ८ यावेळेत ही प्रवचनमाला सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.
कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, कर्म आणि कर्मयोग यातील फरक, कर्माचा नव्हे तर फलाचा त्याग, अवतार घेण्यामागचे प्रयोजन, अवतारातील कर्मयोग, संत संगतीचे महत्त्व, योगाचे आणि प्राणायामाचे स्वरूप अशा विविध विषयांवर विवेचन करीत श्री गणेशांनी गणेश गीतेतील कर्मयोग स्पष्ट केलेला आहे. या निरूपण मालिकेत या सर्व विषयांचे सविस्तर स्पष्टीकरण स्वानंद पुंड शास्त्री महाराज करीत आहेत. तरी गणेशभक्तांनी प्रवचनमालेत मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
- फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ‘श्री गणेश गीतेतील कर्मयोग’ या विषयावरील निरूपणमालेचे आयोजन श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. याविषयावर चौथ्या पुष्पाच्या दिवशी निरूपण करताना यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज.