September 9, 2026

गोपाळ गायन समाजात गोकुळाष्टमीनिमित्त सांगितीक कार्यक्रम

0
IMG-20260904-WA0043
Spread the love

पुणे : श्रीकृष्णजन्माष्टमीचे औचित्य साधून कृष्णस्तुतीच्या रचना केंद्रस्थानी ठेवत, प्रसिद्ध गायक पं. मुकुंद राम मराठे यांनी सादर केलेली मैफल रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी ठरली. पूरिया, तिलककामोद असे परिपक्व रागगायन आणि नंतर नाट्यपदे व भक्तीरचनांनी निर्माण झालेले भावपूर्ण वातावरण, यांचा अनुभव रसिकांना मिळाला.
निमित्त होते गोपाळ गायन समाजाच्या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित तीन दिवसीय गोकुळाष्टमी महोत्सवाचे. गोपाळ गायन समाज येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शाहीर अंबादास तावरे आणि सहकाऱ्यांचे पोवाडा गायन झाले. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धा मुखडे यांच्या कृष्णवंदनेने झाली. त्यानंतर ‘बाजे मुरलिय बाजे’ या रचनेवर नृत्याविष्कार सादर केला. उत्तरार्धात पं. रमाकांत परांजपे यांचे व्हायोलिन वादन झाले. त्यांना अभिजित जायदे (तबला) साथसंगत केली.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पं. मुकुंद मराठे यांनी मैफिलीची सुरवात समयोचित अशा राग पूरियाने केली. विलंबित एकतालातील ‘ए पिया गुणवंता’ हा ख्याल आणि ‘श्यामसुंदर रे’ ही द्रुत त्रितालातील मा. कृष्णराव यांची बंदिश त्यांनी सादर केली. राग तिलककामोदमधील रूपक तालातील ‘सूरसंगत रागविद्या’ ही प्रसिद्ध रचना आणि एकतालातील ‘मन में मोहन बिराजे’ ही एकतालातील बंदिश पं. मराठे यांनी पेश केली. पाठोपाठ त्रितालातील ‘कान्हा क्या मोहनी करे रे’ (खमाज व आरभी रागांचे मिश्रण), बिहारी नट रागातील त्रितालातील ‘जावो जी तुम जावो’ ही बंदिश, स्वयंवर नाटकातील पं. भास्करबुवा बखले यांनी बांधलेले ‘रमणी मजसी निजधाम’ हे पूर्वी रागातील त्रितालातील नाट्यपद, जय जय गौरीशंकर या नाटकातील बिलावल रागावर आधारीत ‘निराकार ओंकार’ हे नाट्यपद, मंदारमाला नाटकातील ‘हरी मेरो जीवन प्राण आधार’ हे मीराभजन, संत नामदेवांची ‘परब्रह्म निष्काम’ ही रचना, ‘देखो मोरी चुरिया’ आणि ‘आयो फागुन मास’ (रूपक ताल) अशा मा. कृष्णरावांच्या भैरवीतील रचना ऐकवून पं. मराठे यांनी या रंगतदार मैफिलीची सांगता केली. त्यांना संजय गोगटे (संवादिनी), अभिजीत जायदे (तबला) तसेच शार्दूल काळे व शिवम सोनी (तानपुरा) यांनी साथ केली.
मध्यंतरात संगीत नाटक अकादमी सन्मान मिळाल्याबद्दल पं. मुकुंद मराठे तसेच ज्येष्ठ सनईवादक पं. शैलेश भागवत यांचा संस्थेचे विश्वस्त अनिल देसाई यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त डॉ. अरुणा चाफेकर, डॉ. विकास कशाळकर उपस्थित होते. पं. मुकुंद मराठे यांनी पं. राम मराठे यांचे छायाचित्र गोपाळ गायन समाज संस्थेला भेट दिले.
अंजली लाळे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ गायिका बकुल पंडित, अनुराधा मराठे, मंगला आपटे, पं. पांडुरंग मुखडे, प्रिया फुलंब्रीकर, देसाई परिवारातील सदस्य, भारत गायन समाजाचे प्रतिनिधी सतीश दातार उपस्थित होते.
फोटो ओळ : संगीत नाटक अकादमी सन्मान मिळाल्याबद्दल पं. मुकुंद मराठे, पं. शैलेश भागवत गोपाळ यांचा गोपाळ गायन समाज येथे सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित (डावीकडून) अनिल देसाई, पं. भागवत, पं. मराठे, डॉ. विकास कशाळकर, डॉ. अरुणा चाफेकर.
प्रति,
मा. संपादक
गोपाळ गायन समाजाच्या शतकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय गोकुळाष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावा ही विनंती.
डॉ. अरुणा चाफेकर, विश्वस्त
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी