September 9, 2026

पुणे महिला मंडळ शताब्दीनिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभवर्तमानात सर्वार्थाने जगायला शिकणे ही मानसिक आरोग्याची गुरूकिल्ली : डॉ. पूजा देखणे

0
IMG-20260909-WA0028
Spread the love

पुणे : शरीराने वर्तमानकाळात वावरताना, आपले मन विचार, भावना सदैव भूतकाळातील घटनांत किंवा भवितव्याच्या विचारांत हरवलेले असते. परिणामी, नित्यनैमित्तिक घटनांतून उत्पन्न होणारे ताणतणाव दाबून टाकले जातात आणि मानसिक अनारोग्याची सुरवात होते. त्यामुळे सर्वार्थाने वर्तमानात जगायला शिकणे गरजेचे आहे, तीच मानसिक आरोग्याची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन मानसशास्त्रतज्ज्ञ डॉ. पूजा देखणे यांनी येथे केले.

पुणे महिला मंडळाच्या शताब्दी महोत्सवाअंतर्गत शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अद्वैता उमराणीकर, प्रतिभा भट, डॉ. रेवती कामत, संगीता अत्रे, शोभा आबनावे आणि सुप्रिया सेनगुप्ता यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. पुणे महिला मंडळाच्या अध्यक्ष केतकी कुलकर्णी अध्यक्षस्थानी होत्या. विशेष पाहुण्या म्हणून ॲस्ट्रो एज्यु, पुणेच्या लीना बोकील उपस्थित होत्या. या निमित्ताने डॉ. पूजा देखणे यांचे ‘गुरूकिल्ली मानसिक आरोग्याची’ या विषयावर व्याख्यान झाले. पर्वती येथील मंडळाच्या वास्तूत मंगळवारी हा समारंभ झाला.

डॉ. देखणे म्हणाल्या, ताणतणाव निर्माण होणे हा सामाजिक जीवनातील सहजभाव आहे. आपण त्याचा स्वीकार कसा करतो, त्यांचे व्यवस्थापन कसे करतो, हे महत्त्वाचे आहे. कुठलीही मानवी भावना स्वतःची अशी ऊर्जा सोबत घेऊन येते. ती भावना योग्य पद्धतीने प्रकट करता आल्यास या उर्जेचेही योग्य उत्सर्जन होते. मात्र, भावना व्यक्त न केल्यास ही ऊर्जा दबून राहते. ती एखाद्या हिमनगाप्रमाणे धोकादायक ठरू शकते आणि या ना त्या रूपाने प्रकट होण्याचे मार्ग शोधते. ते मार्ग न मिळाल्यास मानसिक अनारोग्याचा स्फोट होतो आणि पहिली लक्षणे शारीरिक अस्वास्थ निर्माण करतात. आपल्याकडे शारीरिक आरोग्याविषयी काही प्रमाणात जागरुकता दिसते, पण मानसिक आरोग्याविषयी पराकोटीची अनास्था व दुर्लक्ष आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येनुसार ताणतणावांचे, दबावांचे, अपयशाचे प्रसंग हाताळण्यास सक्षम अशी मनाची अवस्था, व्यक्तीला मानसिक आरोग्याकडे नेणारी ठरते. त्यासाठी स्वतःच्या भावना ओळखता येणे, सतत नवीन शिकण्याची तयारी ठेवून मेंदू कार्यरत ठेवणे आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव असणे, असे काही निकष आहेत.

नव्या पिढीत संवेदनशीलता कमी दिसते, ही वस्तुस्थिती असली तरी मागच्या पिढीचा नव्या पिढीशी संवाद हरवला आहे, नव्या पिढीला सतत सर्व काही देणे, पुरवणे, एवढ्यापुरतेच पालकत्व दिसते आहे. त्यामुळे युवा पिढीचा शारीरिक, सामाजिक, भावनिक, बौद्धिक आणि नैतिक विकास बाजूला पडला आहे. त्याची परिणती विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, व्यसनाधीनता, विकृती, व्यभिचार, स्वैराचार अशा वाटांनी वाढत चालली आहे. कुठलेही अपयश सहन करता न येणे, क्षमाशील वृत्तीचा अभाव, सतत नैराश्य येणे ही त्याचीच उदाहरणे आहेत. हे चित्र बदलण्यासाठी मानसिक आरोग्याच्या दिशेने समाज म्हणून आपली वाटचाल होणे आवश्यक आहे, असेही देखणे यांनी सांगितले.

प्रास्ताविकात मंडळाच्या अध्यक्ष केतकी कुलकर्णी यांनी मंडळाच्या शताब्दीपर्यंतची वाटचाल आणि महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित उपक्रमांची माहिती दिली. पुणे महिला मंडळ आपल्या १२ शाखांद्वारा कार्यरत असून, महिला विकास आणि बालकल्याण हे मंडळाचे उद्दिष्ट आहे. अधिकाधिक स्त्रियांना मंडळाच्या कार्याशी जोडून घेण्याचा संकल्प कार्यकारिणीने केला आहे. शताब्दीनिमित्त मंडळातर्फे स्मरणिक प्रकाशित होणार आहे. तसेच उद्योजकीय मानसिकता निर्माण होण्यासाठी मार्गदर्शनपर उपक्रम होणार आहेत, असे त्या म्हणाल्या.

लीना बोकील यांनी अमेरिकेच्या नासा संस्थेतील शैक्षणिक उपक्रमांची व शिष्यवृत्तींची माहिती दिली. आदर्श शिक्षक सन्मानप्राप्त शिक्षिकांनीही मनोगते मांडली. संयुक्त स्त्री संस्थेच्या नीता राजपूत तेसच वैभवलक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या सुरेखा राजमाने, पर्वती भागातील संस्थांचे संस्थापक शेखर कोरडे यांचाही गौरव करण्यात आला. पुणे महिला मंडळ संस्थेच्या चिटणीस उल्का शहा, सह चिटणीस वैशाली देशपांडे आदी उपस्थित होत्या. पुष्पा कोळपे, डॉ. शिल्पा अग्निहोत्री, शैलजा केळकर यांनी परिचय करून दिला. उल्का शहा यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : पुणे महिला मंडळ आयोजित कार्यक्रमात पुरस्कारप्राप्त शिक्षकांसह मान्यवर.
प्रति,
मा. संपादक
पुणे महिला मंडळाच्या शताब्दी महोत्सवाअंतर्गत शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
केतकी कुलकर्णी, अध्यक्ष
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी