August 21, 2026

काँग्रेस मुख्यालयात ‘वंदे मातरम्’चा अवमान; सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात गुडलक चौकात भाजयुमोचे तीव्र आंदोलन

0
IMG-20260817-WA0061
Spread the love

  • राहुल गांधींनी देशाची जाहीर माफी मागावी, अन्यथा २२ ऑगस्टचा पुणे दौरा उधळून लावणार – दुष्यंत मोहोळ यांचा सज्जड इशारा

पुणे, दि. १७ ऑगस्ट :
नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत अवमान झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), पुणे शहरच्या वतीने आज डेक्कन परिसरातील ऐतिहासिक गुडलक चौकात अत्यंत आक्रमक आणि तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात भाजयुमोचे शेकडो पदाधिकारी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी आणि राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत गगनभेदी घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहरचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी काँग्रेस पक्षावर आणि गांधी घराण्यावर जोरदार तोफ डागली.

दुष्यंत मोहोळ म्हणाले, “काँग्रेस मुख्यालयात घडलेला प्रकार हा केवळ एका गीताचा अवमान नसून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा, सार्वभौमत्वाचा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या लाखो हुतात्म्यांचा थेट अपमान आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेले ‘वंदे मातरम्’ हे केवळ राष्ट्रीय गीत नसून इंग्रजी हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या क्रांतीकारकांना फासावर जाताना ऊर्जा देणारा महामंत्र होते. ज्या पवित्र गीताने अखंड भारताला एकत्र आणले, त्याच गीताचा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर अनादर करून काँग्रेसची राष्ट्रविरोधी आणि तुष्टीकरणाची मानसिकता पुन्हा एकदा उघड केली आहे.”

काँग्रेसच्या विचारसरणीवर ताशेरे ओढताना मोहोळ पुढे म्हणाले, “या देशात राहायचे असेल तर प्रत्येकाला ‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागेल आणि त्याचा आदर करावाच लागेल. देशभक्ती ही केवळ भाषणांमधून सिद्ध होत नाही, तर ती आचार, विचार आणि कृतीतून दिसावी लागते. राष्ट्रभक्तीसाठी रक्तात देशी संस्कार असावे लागतात; विदेशी मानसिकता आणि संस्कृतीत वाढलेल्या लोकांकडून भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा ठेवणेच मुळात चुकीचे आहे.”

राहुल गांधी यांना थेट इशारा देताना दुष्यंत मोहोळ यांनी ठाम भूमिका मांडली की, “काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रीय गीताचा अवमान करून देशातील १४० कोटी जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाची जाहीर व बिनशर्त माफी मागितली पाहिजे. जर राहुल गांधींनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली नाही, तर आगामी २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणारा त्यांचा नियोजित दौरा भारतीय जनता युवा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. भाजयुमोचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्यांचा पुणे दौरा उधळून लावतील.”

गुडलक चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा ध्वज, फलक घेऊन ‘वंदे मातरम् चा अपमान सहन करणार नाही’, ‘काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो’, ‘राहुल गांधी माफी मागा’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात सर्वेश मेंदळे, संकेत शितोळे,राकेश शिंदे,सागर शेटे, अनुराग मिश्रा,सुचित देशपांडे, संकेत बिरामणे,तेजस मारणे,रोहन कोकाटे,प्रवीण वनशिव,पंकज गीते,ऋषिकेश बराटे,किरण ओरसे, यशराज टिळेकर, योगेश कन्नूर, योगेश जगताप, पौर्णिमा अनासपुरे, मनीषा धारणे, जोशना पांडे, जागृती विचारे, सुप्रिता जेऊर, यांच्या समवेत युवतींचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान आणि स्वातंत्र्यवीरांचे बलिदान अबाधित ठेवण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा अशा देशविरोधी वृत्तीविरोधात रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

  • दुष्यंत मोहोळ
    अध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी