स्वान फाउंडेशनचे कोषाध्यक्ष अक्षय खोब्रागडे यांना केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार २०२६’ प्रदान
सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल स्वान फाउंडेशनचे कोषाध्यक्ष तथा नॉलेज नेस्ट (Knowledge Nest Initiative) उपक्रमाचे मार्गदर्शक अक्षय खोब्रागडे यांना ‘उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार २०२६’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य समारंभात भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायने व खते मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास भारताचे माजी सरन्यायाधीश तथा राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती पी. सदाशिवम, महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई, ॲग्रीकल्चर टुडे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. जे. खान, हरियाणाचे माजी कृषिमंत्री ओ. पी. धनखड तसेच कॅनडा सरकारचे प्रतिनिधी एच. ई. ख्रिस्तोफर कुटर यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली या दुर्गम आदिवासी गावातील आश्रमशाळेत शिक्षण घेतलेल्या अक्षय खोब्रागडे यांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ते सलाम किसान येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Operating Officer – COO) म्हणून कार्यरत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ड्रोन तंत्रज्ञान, डिजिटल कृषी, सर्क्युलर इकॉनॉमी आणि ग्रामीण नवोपक्रमाच्या माध्यमातून देशातील लाखो शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत.
याचबरोबर, स्वान फाउंडेशनचे कोषाध्यक्ष म्हणून ते ग्रामीण आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या Knowledge Nest Initiative या उपक्रमाचे नेतृत्व व मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना NASA (अमेरिका) आणि सिंगापूर येथे शैक्षणिक अभ्यासदौऱ्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, नेतृत्व आणि नवोपक्रमाशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून केले जात आहे.
केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते प्राप्त झालेला हा राष्ट्रीय सन्मान केवळ अक्षय खोब्रागडे यांच्या वैयक्तिक कार्याचा गौरव नसून ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांच्या क्षमतेचा सन्मान आहे. गिलबिलीसारख्या दुर्गम गावातून राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारापर्यंतचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास हा जिद्द, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कठोर परिश्रम आणि समाजसेवेच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते, याचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
