June 25, 2026

बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक राजधानीचे वैभव

0
IMG-20260624-WA0069
Spread the love

५८ व्या वर्धापन दिनी उल्हास पवार यांचे गौरवोद्गार

पुणे / प्रतिनिधी: बालगंधर्व रंगमंदिर हे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराचे वैभव आहे. महाराष्ट्राचे लाडके हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारणी झालेल्या बालगंधर्व रंगमंदिर आता केवळ शहराच्या अथवा महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत, रसिकाग्रणी उल्हास पवार यांनी काढले.

बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बालगंधर्व महोत्सवाचे अध्यक्षस्थानावरून उल्हास पवार बोलत होते.

यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ संजय चोरडिया, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे,अभिनेते सुशांत शेलार,अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अशोककुमार सराफ,बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,अलविरा मोशन एंटरटेन्मेंटच्या दिपाली कांबळे,ॲड. मंदार जोशी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात ‘मेलडी मेकर्स’च्या माध्यमातून सिने संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अशोककुमार सराफ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे पद्मश्री रघुवीर खेडेकर, जेष्ठ पत्रकार विद्याधर कुलकर्णी, सागर आव्हाड, विजय जगताप,राज देशमुख, गायिका सावनी दातार कुलकर्णी,अलविरा झरेकर, चित्रपट निर्माते दत्ता दळवी, मंगेश मोरे, डॉ. गौरव घोडे, लोककलावंत, लेखक व दंतचिकित्सक आशुतोष जावडेकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचाही या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

बालगंधर्व रंगमंदिराच्या भूमिपूजन आणि उद्घाटन या दोन्ही ऐतिहासिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी आपल्याला प्राप्त झाल्याची आठवण उल्हास पवार यांनी यावेळी सांगितली. शास्त्रीय संगीत, नाटक, लोककला अशा सर्व कलाप्रकारांना बालगंधर्व रंगमंदिराच्या माध्यमातून न्याय मिळाल्याचे उल्हास पवार यांनी नमूद केले. कोणत्याही कला प्रकारांमध्ये श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असे काही असत नाही. नाट्यसंगीत हा शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, दादरा, ठुमरी या प्रकारांचा सुरेल संगम असल्याचे त्यांनी नमूद केले. ऋषितुल्य गायक पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, सुधीर फडके अशा कलाकारांच्या स्वर्गीय सादरीकरणाचा साक्षीदार बालगंधर्व रंगमंदिर असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्याला मिळालेल्या जीवनगौरव पुरस्कार हा आपल्या एकट्याचा नसून आपल्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान असल्याचे अशोककुमार सराफ यांनी कृतज्ञतेने नमूद केले. मेलडी मेकर्सने देशाच्या सर्व राज्यात आणि जगातील बहुतेक महत्त्वाच्या देशांमध्ये सादरीकरण केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या शेकडो कलाकारांच्या प्रयत्नांनीच हे शिखर गाठणे शक्य झाल्याचे ते म्हणाले. बालगंधर्व रंगमंदिर आणि मेलडी मेकर्स यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमाचे पहिले बुकिंग मेलडी मेकर्सचे असल्याचे सराफ यांनी अभिमानाने नमूद केले. सुरुवातीच्या काळात बालगंधर्व रंगमंदिरात साऊंड सिस्टिम नसल्याने तब्बल एक महिना मेलडी मेकर्सची साऊंड सिस्टिम रंगमंदिरात वापरण्यात आल्याची आठवणही त्यांनी कथन केली. शाळकरी मित्रांच्या कला प्रेमामुळे एकत्र आलेल्या कलाकार मित्रांचा पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी झालेला पहिला कार्यक्रम ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मेलडी मेकर्स हा वाद्यवृंद, हा प्रवास सराफ यांनी कथन केला.

मेलडी मेकर्स या संगीत क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या वाद्यवृंदाचा प्रवास पुस्तक स्वरूपात उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा राजेश पांडे यांनी व्यक्त केली. चित्रपट महामंडळाने महाराष्ट्रातील चित्रपट सृष्टीला पुनर्वैभव प्राप्त करून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

बालगंधर्व रंगमंदिराबरोबर राज्यातील सर्वच कलाकारांचे जिव्हाळ्याचे नाते असल्याचे वर्षा उसगावकर यांनी नमूद केले. पुणेकर रसिक सुखंदळ असल्याचे सर्वज्ञात आहे. त्यांच्या परीक्षेत आपण कायमच उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले. ज्या काळात ऑर्केस्ट्रा म्हणजे हिंदी चित्रपट संगीताची भ्रष्ट नक्कल असे समजले जात होते त्या काळात अशोककुमार सराफ यांचा मेलडी मेकर्स आणि प्रमिला दातार यांचा ऑर्केस्ट्रा यांनी ऑर्केस्ट्रा या प्रकाराला प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून दिला, असे वर्षा उसगावकर यांनी नमूद केले.

बालगंधर्व रंगमंदिर हा कलाकारांबरोबरच केवळ पुण्यातीलच नव्हे तर राज्यभरातील कला रसिकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. बालगंधर्व रंग मदिराचा पुनर्विकास निश्चितच स्वागतार्ह आहे. कलाकार म्हणून आमच्याकडून त्याला कोणतीही आडकाठी नाही. आम्ही त्याला सहकार्य करू. मात्र, हा पुनर्विकास कलाकारांना विश्वासात घेऊन केला जावा, अशी अपेक्षा मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केली. मुंबईप्रमाणेच पुण्यातही चित्रनगरी व्हावी, या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. फेब्रुवारी २०२७ महिन्यात चित्रपट महामंडळाच्या वतीने पुण्यात चित्रपट संमेलन आयोजित केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले तर अनिल गुंजाळ यांनी आभार मानले.

चौकट:
मराठी भाषा, मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट टिकले पाहिजेत हे केवळ भाषणापुरते न राहता आपण त्यासाठी काय करणार आहोत, याचा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक असल्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी नमूद केले. सध्याच्या काळात चित्रपटगृह बंद होत आहेत. मल्टिप्लेक्स सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध होत नाही. या सर्व परिस्थितीबाबत रसिकांपासून राज्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे, असे वाडेकर यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंग मंदिराचा पुनर्विकास करताना कलाकार आणि रसिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे पुनर्विकास केला जाईल, याची ग्वाही त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी