हेलन केलर जयंती व सक्षम स्थापना दिनानिमित्त सहसंवेदना सजगता कार्यशाळेचे आयोजन
पुणे : जागतिक स्तरावर प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त तसेच सक्षमच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून, सक्षम – समदृष्टी, क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ, पुणे आणि स्वरनेत्र फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “सहसंवेदना सजगता कार्यशाळा” (Empathy Awareness Workshop) चे आयोजन शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा सक्षमच्या दिव्यांग सेवा केंद्र, वि. रा. रुईया मूकबधिर विद्यालय, स. प. महाविद्यालय आवार, लोकमान्यनगर, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्था व संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, दिव्यांग मुलांचे पालक व कुटुंबीय, विशेष शिक्षक, समुपदेशक, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, समाजशास्त्राचे विद्यार्थी तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक आणि संवेदनशील नागरिक यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक “ब्रेल मॅन ऑफ इंडिया” म्हणून परिचित असलेले श्री. स्वागत थोरात असून, कार्यशाळेचे समन्वयन व सहाय्यक प्रशिक्षण सौ. स्वरूपा देशपांडे करणार आहेत.
कार्यशाळेमध्ये अपंगत्वाचे विविध प्रकार व त्यांतील आव्हाने, Sympathy नव्हे तर Empathy विकसित करण्याचे महत्त्व, सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, ज्ञानेंद्रियांचा प्रभावी वापर, सांघिक भावना व समावेशकता यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच विविध अनुभवाधारित उपक्रम, प्रात्यक्षिके आणि सहभागात्मक सत्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सक्षम कार्यालय, पुणे यांच्याशी ९२८४४७९१८६ या मोबाईल क्रमांकावर सकाळी ११ ते दुपारी ५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सक्षम पुणे महानगरचे सचिव श्री. अशोक दशरथ जव्हेरी आणि स्वरनेत्र फाऊंडेशन संस्थापक-अध्यक्ष तथा सक्षम पुणे महानगर दृष्टी प्रकोष्ठ प्रमुख सौ. रेणु कोडोलीकर यांनी केले आहे.
