September 24, 2026

-थायलंडमध्ये होणार महाराष्ट्राच्या ढोल-ताशांचा गजर

0
IMG-20260912-WA0028
Spread the love

ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र आणि समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढाल तलवार पथक पुणे ; तीन दिवस तीन वेगवेगळ्या सांस्कृतिक संकल्पनांचे सादरीकरण

पुणे : महाराष्ट्राची पारंपरिक ढोल-ताशा वादनाची कला आणि सांस्कृतिक परंपरा थायलंडमधील फुकेत येथे यंदाच्या गणेशोत्सवात सादर होणार आहे. ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्र आणि आणि समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढाल तलवार पथक पुणे यांच्या वतीने २० वादकांचे पथक थायलंडमधील फुकेत येथे जाणार असून, तीन दिवस तीन वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित ढोल-ताशा वादनाचे सादरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला आमदार हेमंत रासने, ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, शिरीष थिटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, राजाभाऊ चव्हाण, डॉ.अ.ल.देशमुख, फुकेत मधील ‘लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय’ चे समन्वयक चेतन लोढा, कलावंत पथकाचे सौरभ गोखले, समर्थ प्रतिष्ठानचे संजय सातपुते, अथर्व कुलकर्णी, संदेश खरात, निरंजन माळवदकर आदी उपस्थित होते.
यावेळी समन्वयक चेतन लोढा यांनी फुकेत येथील मंदिराविषयी आणि उत्सवाविषयी सविस्तर कथन केले.

संजय सातपुते म्हणाले, भगवाधारी थीम, महाराष्ट्राचे पारंपरिक ढोल-ताशा वादन आणि पंढरीचे वारकरी वादन अशा विविध रूपांतून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख फुकेतमध्ये साकारली जाणार आहे. समर्थ प्रतिष्ठानचे पथक दि.१३ सप्टेंबर रोजी पहाटे ३.३० वाजता मुंबईहून फुकेतकडे रवाना होणार असून, तीन दिवस विविध प्रकारचे वादन तेथे होणार आहे. तसेच दि.१७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता फुकेतहून मुंबईकडे रवाना होणार आहे.

पथकामध्ये १२ ढोल, ४ ताशा, १ ध्वज आणि १ टोल यांचा समावेश असून, प्रत्येक दिवशी वादनासोबत त्या त्या संकल्पनेनुसार पारंपरिक पेहराव करण्यात येणार आहे. भगव्या कुर्त्यासह फेटा, पारंपरिक गणवेश, वारकरी पेहराव तसेच नऊवारी साडी अशा वेशभूषेत कलाकार सादरीकरण करणार आहेत. दि. १४ सप्टेंबर रोजी भगवाधारी थीम, १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे पारंपरिक ढोल-ताशा वादन, तर १६ सप्टेंबर रोजी पंढरीचे वारकरी वादन सादर केले जाणार आहे. दि. १८ सप्टेंबर रोजी सांगता मिरवणूक होणार असून त्यामध्ये कलावंत पथक सहभागी होणार आहे. त्यामध्ये मराठी नाट्य सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत.

या उपक्रमातून फुकेत येथे महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल-ताशा वादनाचा आणि वारकरी संस्कृतीचा सांस्कृतिक ठसा पुण्याचे वादक उमटवणार आहेत. फुकेत मध्ये मोठया संख्येने गणेशभक्त असून थायलंड मधील निस्सीम गणेशभक्त पापासोर्न मीपा यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती थायलंड मधील गणेश भक्तांनी हुबेहूब मंदिर स्वरूपात साकारली आहे. तसेच दगडूशेठ बाप्पाच्या हुबेहूब मूर्तीची प्रतिष्ठापना देखील मंदिरात करण्यात आली आहे. याच मंदिराच्या गणेशोत्सवात वादनसेवा दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी