August 4, 2026

गझलेच्या रचनेपेक्षा आशयाला दाद देणारी रसिकता हवी : शांताराम खामकर

0
IMG-20260803-WA0026
Spread the love

साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे गझलदीप पुरस्काराने शांताराम खामकर यांचा गौरव

पुणे : गझलेकडे आधी रसिक म्हणून न पाहता, समीक्षकीय दृष्टीने पाहण्याची वृत्ती दिसून येते. ती गझलेला मारक आहे. गझलेच्या व्याकरणापेक्षा आधी आशयाला दाद देणे, ही रसिकता जपली पाहिजे. समीक्षकीय दोष शोधण्यात मूळ आशय दुर्लक्षित होऊ नये, अशी अपेक्षा अहिल्यानगर येथील प्रसिद्ध गझलकार शांताराम (शाम) खामकर यांनी रविवारी व्यक्त केली.

साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे सुप्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे यांच्या स्मृत्यर्थ देण्यात येणाऱ्या गझलदीप पुरस्काराने शांताराम खामकर यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. प्रसिद्ध गझलकार प्रमोद खराडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तडवळकर, वि. सु. चव्हाण, ॲड. विलास अत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

शामकांत खामकर म्हणाले, गझललेखन मी पुण्यात शिकलो आणि माझ्या गझलेचा गौरवही पुण्यानेच केला, याचा आनंद मोठा आहे. हा पुरस्कार अनिल कांबळे यांच्यासारख्या श्रेष्ठ गझलकाराच्या नावाचा आहे, ही भाग्याची गोष्ट वाटते. सध्या गझललेखन विपुल होत आहे. मात्र, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कविता आणि गझल असा वाद उत्पन्न होणे, योग्य वाटत नाही. उत्तम आशयाची आणि गझलशुचिता पाळून गझल लिहिणे, हा प्राधान्यक्रम असून, वाद बाजूला ठेवले पाहिजेत.

प्रमोद खराडे म्हणाले, गझललेखनाचे प्रमाण वाढले आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र, ती सकस असेल तरच रसिकांपर्यंत पोचते आणि टिकते, हे लक्षात ठेवले पाहिजे. बनचुकेपणा क्वचित खपून जातो, पण गुणवत्तेचे लेखन सातत्यातून येते.

प्रास्ताविकात ज्योत्स्ना चांदगुडे यांनी साहित्यदीप प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. गझलकार अनिल कांबळे यांच्या प्रेरणेतूनच प्रतिष्ठानचे कार्य सुरू आहे, असे त्या म्हणाल्या. धनंजय तडवळकर यांनी मानपत्राचे वाचन केले. वैजयंती आपटे यांनी आभार मानले. चिन्मयी चिटणीस, प्राजक्ता पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘मेणबत्त्यांच्या मशाली’ या शीर्षकांतर्गत भूषण कटककर यांच्या अध्यक्षतेखाली मुशायरा झाला. त्यामध्ये पुरस्कारप्राप्त गझलकार शांताराम खामकर यांच्यासह मिलिंद छत्रे, मीना शिंदे, प्रमोद खराडे, श्रीपाद जोशी, संदीप जाधव, मंदार खरे, शोभा तेलंग यांनी भाग घेतला.
फोटो ओळ : चिन्मयी चिटणीस, ॲड. विलास अत्रे, धनंजय तडवळकर, प्रमोद खराडे, शांताराम खामकर, ज्योत्स्ना चांदगुडे, वि. सु. चव्हाण, वैजयंती आपटे.
प्रति,
मा. संपादक
साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे सुप्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे स्मृतिप्रित्यर्थ गझलदीप पुरस्काराने सुप्रसिद्ध गझलकार शांताराम (शाम) खामकर यांचा रविवारी गौरव करण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्‌धी द्यावी ही विनंती.
ज्योत्स्ना चांदगुडे, अध्यक्ष
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी