मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप
दिव्यांगांना मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतील विशेष अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे (दि २८): महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कसबा विधानसभा मतदारसंघात दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी सहाय्यक कृत्रिम अवयव वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा सुमारे एक हजार दिव्यांग बांधवांनी लाभ घेतला.
अलिम्को आणि एसआर ट्रस्ट, इंदौर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक लाभार्थ्याची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजेनुसार कृत्रिम हात, कृत्रिम पाय, कॅलिपर्स, व्हीलचेअर, ट्रायसायकल तसेच इतर सहाय्यभूत उपकरणांचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले, “सहाय्यक कृत्रिम अवयव हे केवळ वैद्यकीय साधन नसून दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात नव्या आशा, नव्या संधी आणि आत्मविश्वास निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
या प्रसंगी मंडल अध्यक्ष अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे, नगरसेवक राजेंद्र काकडे, राघवेंद्र मानकर, कुणाल टिळक, देवेंद्र वडके, उदय लेले, अजय खेडेकर, नगरसेविका स्वरदा बापट, ऐश्वर्या थोरात, स्नेहा मावळदे, स्वप्नाली पंडित, पल्लवी जावळे, कल्पना बहिरट, वैद्यकीय सहायक राजेंद्र परदेशी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.
