September 20, 2026

उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटी

0
IMG-20260921-WA0045
Spread the love
  • महापालिकेच्या तयारीची मंडळ पदाधिकाऱ्यांना माहिती; मेट्रो, पोलिस आणि पालिका प्रशासनाला आवश्यक नियोजनाच्या सूचना

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेटी देऊन उत्सवाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आणि सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ, अखिल मंडई मंडळ आणि साने गुरुजी मंडळांना भेट देत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

गणेशोत्सवासाठी पुण्यात राज्याच्या विविध भागांसह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सुविधा व उपाययोजनांची माहिती वाडेकर यांनी घेतली. भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि इतर नागरी सुविधांबाबत प्रशासनाच्या नियोजनाचाही त्यांनी आढावा घेतला.

गणेशोत्सव काळात पुणे शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी मेट्रो सेवा महत्त्वाची ठरत असल्याचे वाडेकर यांनी सांगितले. मेट्रोमुळे मोठ्या संख्येने नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागात पोहोचत असल्याने वाहतूक कोंडी कमी करण्यास तसेच भाविकांना सुलभ प्रवासाची सुविधा मिळण्यास मदत होत आहे. पुढील वर्षी हिंजवडी मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रो प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने त्याचा विचार करून आगामी गणेशोत्सवासाठी महापालिका आणि मेट्रो प्रशासनाने आतापासूनच आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मेट्रो स्थानके तसेच प्रमुख गणेश मंडळांच्या परिसरात वाढणारी गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही वाडेकर यांनी नमूद केले. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली.

गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील महत्त्वाचा उत्सव असून, दरवर्षी लाखो भाविक शहरातील मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांना भेट देतात. भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि शिस्तबद्ध वातावरण मिळावे यासाठी महापालिका, मेट्रो प्रशासन, पोलिस आणि गणेश मंडळांनी परस्पर समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे वाडेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी