गायन, वादनातून रसिकांनी अनुभवला ‘मेघरंग’गांधर्व महाविद्यालयातर्फे संगीत समारोहाचे आयोजन
पुणे : दुर्गा, मियाँ मल्हार, यमन, श्याम कल्याण, मेघमल्हार, शुद्ध मल्हार, देस आदी रागांवर आधारित बंदिशींद्वारे रसिकांनी वर्षा ऋतूचा सांगितीक आनंद घेतला. निमित्त होते भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे वर्षा ऋतू आणि मल्हार रागांवर आधारित ‘मेघरंग’ या दोन दिवसीय संगीत समारोहाचे.
शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णु विनायक स्वरमंदिरात समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्घाटन प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे, पंडित पांडुरंग मुखडे, डॉ. अरविंद थत्ते, शीलाताई देशपांडे, बाळासाहेब मिरजकर, श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रार्थना सादर केली.
महोत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध गायक श्रीकांत देशपांडे यांचे दोन तानपुरे शीलाताई देशपांडे आणि श्रीनिवास जोशी यांच्या हस्ते गांधर्व महाविद्यालयाला प्रदान करण्यात आले.
महोत्सवास पुण्याचे आयकर विभागाचे अप्पर आयुक्त शशांक देवगडकर, जीएसटी आणि कस्टम्सचे अप्पर आयुक्त अन्वेष चटर्जी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महोत्सवाची सुरुवात युवा गायक मंदार गाडगीळ यांच्या मैफलीने झाली. ‘करीम नाम तेरो’, ‘अत घुमरे’, ‘घेरी घेरी आज’, ‘सावन की सांझ’ या रचना सादर केल्या. त्यानंतर जयपूर-अत्रौली घराण्याच्या सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी सानिया पाटणकर यांची गायन मैफल रंगली. त्यांनी ‘मान न न करिये गोरी’ या बंदिशीला जोडून ‘बरखा बैरी भयो’ आणि त्यानंतर ‘उमड घन गगन आयो री’ ही रचना सादर केली. वर्षा ऋतूवर आधारित साडेसात मात्रांची ‘कारि बदरिया’ आणि त्यानंतर ‘प्रीतमबिन लागत नाही जिया ही’ या बंदिशी सादर केल्या.
संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भेंडीबजार घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर यांनी केली. त्यांनी सुरुवातीस ‘सखी मोरी रुमझुम’ ही बंदिश सादर केली. ‘गरजे बरसे आयी बदरिया आयी रे’, ‘बाजत नगारे घन’ या रचना सादर केल्या. दोन दिवसीय संगीत समारोहाचा समारोप सुप्रसिद्ध सतार वादक संदीप आपटे यांच्या मैफलीने झाला. त्यांनी राग मियाँ की मल्हार सादर केला.
कलाकारांना भरत कामत, आशय कुलकर्णी (तबला), अभिनय रवंदे, सौमित्र क्षीरसागर (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
फोटो ओळ : पं. श्रीकांत देशपांडे यांचे दोन तानपुरे पं. प्रमोद मराठे यांच्याकडे सुपूर्द करताना श्रीनिवास जोशी. समवेत पं. पांडुरंग मुखडे, शीलाताई देशपांडे, बाळासाहेब मिरजकर.
प्रति,
मा. संपादक
भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे वर्षा ऋतू आणि मल्हार रागांवर आधारित ‘मेघरंग’ या दोन दिवसीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
प्रमोद मराठे, प्राचार्य, गांधर्व महाविद्यालय, पुणे
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस (मो. ९९२२९०७८०१)
