आत्मकेंद्रिततेकडून राष्ट्रकेंद्रिततेकडे प्रवास व्हावा : सुमेधा चिथडे
कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे विशेष व्याख्यान : शिष्यवृत्ती वितरण समारंभ
पुणे : देशाच्या संरक्षणासाठी अखंड सेवारत असणाऱ्या आपल्या सैनिकांना गृहीत धरले जाते. सैन्यासाठी सर्वकाही सरकारने करावे, ही अपेक्षा असते. पण अगदी छोट्या कृतीतूनही आपण प्रत्येकजण आपल्या सैनिकांसाठी खूप काही करू शकतो. फक्त अशा सेवाकार्याचे संस्कार करण्याच्या जबाबदारीचे विस्मरण झाले आहे. आत्मकेंद्रिततेकडून राष्ट्रकेंद्रिततेकडे आपला प्रवास होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सीमेवरील जवानांसाठी कार्य करणाऱ्या सुमेधा चिथडे यांनी रविवारी येथे केले. स्वातंत्र्याचा आपण नागरीक म्हणून फक्त उपभोग घेतो, पण त्यासाठी सैनिक श्वास मोजत असतात, याची जाणीव असली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे श्रावणसंध्या तसेच स्वातंत्र्यदिन आणि कारगिल दिवस यांचे औचित्य साधून चिथडे यांचे व्याख्यान तसेच शिष्यवृत्ती वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड मधील पुण्याई सभागृहात कार्यक्रम झाला. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेचे अध्यक्ष अमित शहाणे, कार्यकारिणी सदस्य, डॉ. नंदकुमार एकबोटे आदी उपस्थित होते. आठ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. दीपप्रज्ज्वलन, भारतामाता पूजन आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
सुमेधा चिथडे म्हणाल्या, सैनिक फक्त राष्ट्रधर्म आणि सेवाकार्य जगतात. मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित आव्हाने झेलत, पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीत २४ तास अविरत आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज असतात. आपण गीतेचे फक्त पाठांतर करतो, सैनिक गीता जगून दाखवतात. त्यांच्यासाठी ‘मी’ सर्वांत शेवटी असतो, प्राधान्य असते ते फक्त देशहिताला आणि देशबांधवांच्या सुरक्षेला. सियाचेनसारख्या जगातील सर्वोच्च उंचीवरील रणभूमीवर सज्ज असणाऱ्या आपल्या सैनिकाचा प्रत्येक घास आणि प्रत्येक श्वास, किंमत मागणारा असतो, जी किंमत सैनिक चुकवत असतात आणि आपण सारे फक्त मी, माझे एवढ्यापुरतेच असतो. लष्करी पेशातील कुटुंबामुळे मला याची जाणीव झाली आणि सियाचेन व इतर प्रदेशांत सैनिकांसाठी ऑक्सीजन प्लांट उभारण्याची प्रेरणा मिळाली. २०१९ पासून आजवर चार प्लांट लोकसहभागातून उभारले गेले. अतिदुर्गम प्रदेशातील जखमी सैनिकांसाठी क्रिटिकल केअर रुग्णवाहिका, ई वाहनांची काही प्रमाणात सुविधा निर्माण करता आली. सैनिकांच्या कुटुंबियांसाठी, मुलांसाठी काम करण्याची संधी मिळाली. हे करत असताना, आपले शूर सैनिक हे खरे आयडॉल, त्यांची प्रेरणादायी कहाणी आजच्या तरुणाईसमोर यावी, म्हणून प्रयत्न करत आहे. युवा पिढीला राष्ट्रकार्याकडे कसे वळवता येईल, याचे दिशादर्शन करण्याचा प्रयास आहे. अलीकडे तरुणाईत जोष जरूर दिसतो, पण तो होश हरवलेला आहे. मला काय मिळणार, एवढाच विचार सदैव करणार्यांनी, आधी मी काय देणार, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. काहीतरी देण्यासाठी जगणे, सर्वस्व विसरून ध्यास घेणे, हे आपण विसरून गेलो आहोत. सेलिब्रिटींची नावे धडाधड घेणाऱ्या, त्यांच्यासाठी बेभान होणाऱ्या तरुणाईला परमवीरचक्र मिळवणाऱ्या अस्सल आदर्शांचे विस्मरण झाले आहे. सतत काहीतरी मिळवण्याच्या मागे धावण्यापेक्षा काही देण्यातला आनंद ही तरुणाई कधी मिळवणार, असा सवालही त्यांनी केला. माहिती-तंत्रज्ञानात अव्वल असल्याचा अभिमान धरणाऱ्या तरुणाईने तीच हुशारी सैनिकांना प्रत्यही येणाऱ्या आव्हानांसाठीही वापरावी, त्यासाठी संशोधनात, निर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
संघाने ह्या वर्षी डॉक्टर नंदकुमार एकबोटे ह्यांच्या मार्फत सैनिकांना साडे तीन हजार राख्या पाठवल्या. त्यांच्या ह्या उपक्रमाबद्दल संघाने त्यांचे आभार मानले. डॉक्टर नंदकुमार एकबोटे ह्यांनी ह्या उपक्रमाची प्रेरणा कशी मिळाली ते विषद केले.
प्रकाश जावडेकर यांनी शिक्षणाने मिळणारे सामर्थ्य आणि आनंद पावित्र्य देणारे असते, असे सांगितले. सर्व क्षेत्रांत मुली आघाडीवर असून, केअर, कम्पॅशन, कन्सिस्टन्सी आणि करेज, अशा फोर सी सूत्राचा त्यांनी उल्लेख केला. कऱ्हाडे ब्राह्मण संघ पुणेतर्फे गरजू पण गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
संघाचे पुण्याचे अध्यक्ष अमित शहाणे यांनी प्रास्ताविकात संघाचे उपक्रम आणि भावी योजनांविषयी माहिती दिली. मुक्ता चांदोरकर यांनी परिचय करून दिला. राजश्री महाजनी यांनी ईशस्तवन व पसायदान सादर केले. वैशाली वर्णेकर यांनी सूत्रसंचालन केले. मकरंद फणसळकर यांनी आभार मानले.
फोटो ओळ : कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे आयोजित श्रावणसंध्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रकाश जावडेकर, सुमेधा चिथडे, अमित शहाणे आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेचे पदाधिकारी.
प्रति,
मा. संपादक
कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणेतर्फे स्वातंत्र्य दिन आणि कारगिल विजय दिनानिमित्त सुमेधा चिथडे यांचे रविवारी (दि. ६) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
अमित शहाणे, अध्यक्ष, कऱ्हाडे ब्राह्मण संघ, पुणे
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
