संवादतर्फे चिल्ड्रन फिल्म क्लबची स्थापनामुलांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रबोधनात्मक उपक्रम राबविणार
पुणे : सांस्कृतिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून वेगळा ठसा उमटविलेल्या संवाद, पुणेतर्फे चिल्ड्रन फिल्म क्लबची स्थापना करण्यात येत आहे. महाराष्ट्रात प्रथमच स्थापन करण्यात येत असलेल्या क्लबच्या माध्यमातून लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दर महिन्याच्या चौथ्या रविवारी प्रबोधनात्मक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत, अशी माहिती संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आणि महेश मोटकर यांनी आज (दि. ३) पत्रकार परिषदेत सांगितली.
या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुलांमध्ये सर्जनशीलता, नेतृत्वगुण, संघभावना आणि कार्यक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धा, कार्यशाळा, संवाद सत्रे आणि व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आठ ते चौदा वयोगटातील मुलांना यात सहभागी होता येणार असून रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी पहिला चित्रपट दाखविला जाणार आहे.
येत्या काळात मुलांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी विविध आरोग्यविषयक योजना, शासकीय व खाजगी आरोग्य सुविधांची माहिती तज्ज्ञांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तसेच मुलांच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी ऑनलाइन समुपदेशन (Counselling), सोशल मीडियाचा सुरक्षित व सकारात्मक वापर, करिअर मार्गदर्शन आणि जीवनकौशल्य विकास या संबंधी विशेष सत्रांचे आयोजन केले जाणार आहे.
शिक्षण, क्रीडा, कला, विज्ञान किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुलांचा विशेष गौरव केला जाणार असून त्यांच्या यशाचा सन्मान करून इतर मुलांनाही प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या सर्व उपक्रमांद्वारे मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडवून त्यांना जबाबदार, सुसंस्कृत आणि सक्षम नागरिक बनविण्यासाठी संवाद, पुणे सातत्याने कार्यरत असणार आहे. या उपक्रमाची संकल्पना सुनील महाजन यांची असून संयोजन केतकी महाजन-बोरकर करीत असून सूत्रधार निकिता मोघे आहेत.
नोंदणी प्रक्रिया आवश्यक :
- www.samwadpune.com या सांकेतिक स्थळाला भेट द्या.
- मुख्य पानावरील ‘CFC Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणी फॉर्म पूर्णपणे भरा.
- आपल्या मोबाईल क्रमांकाची OTP द्वारे पडताळणी करा.
- निर्धारित नोंदणी शुल्क भरा.
- नोंदणीची पुष्टी (Confirmation) करा.
- आपले ओळखपत्र (ID Card) डाउनलोड करा.
- पुढील सर्व सूचना, उपक्रमांची माहिती आणि अपडेट्स व्हॉट्सॲपद्वारे मिळवा.
प्रति,
मा. संपादक
सांस्कृतिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून वेगळा ठसा उमटविलेल्या संवाद, पुणेतर्फे चिल्ड्रन फिल्म क्लबची स्थापना करण्यात येत आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
सुनील महाजन, अध्यक्ष, संवाद, पुणे
