तोपर्यंत शेतकरी आत्महत्या करण्यासाठी हतबल : हनुमंत चांदगुडेशेतकरी कवी हनुमंत चांदगुडे यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे विशेष सत्कार
पुणे : समाजात जो पर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या घाम चोरणाऱ्या टोळ्या आहेत तो पर्यंत त्या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी हतबल करत राहतील, अशी व्यथा शेतकरी कवी हनुमंत चांदगुडे यांनी व्यक्त केली. शेतकरी हा फक्त माणसांसाठीच नाही तर पशू, पक्षी, प्राण्यांसाठी देखील जगत असतो. या जगातून शेतकरी वजा केला तर जग सुंदर राहणार नाही. शेतकरी जगला तरच तुम्ही-आम्ही जीवंत राहणार आहोत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
सुमारे २५ वर्षे निसर्ग कविता करणारे शेतकरी कवी हनुमंत चांदगुडे (सुपे, ता. बारामती) यांचा रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सोमवारी (दि. ३) ज्येष्ठ समीक्षक, कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्या वेळी चांदगुडे सत्काराला उत्तर देताना बोलत होते. सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली अडकर, प्रज्ञा महाजन मंचावर होते. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कविता म्हणजे मनाची न कळणारी भूमिका आहे. मला आतापर्यंत कविता पूर्ण कळलेलीच नाही; तर फक्त त्यातील ‘क’ कळला आहे. कवितेचे विश्र्व खूप मोठे असून मी माझ्यापरीने लिखाणाचा प्रयत्न करीत आहे, अशा प्रामाणिक भावना व्यक्त करून हनुमंत चांदगुडे यांनी सामाजिक व्यथा मांडणाऱ्या स्वरचित कवितांचे वाचन केले. ते पुढे म्हणाले, जे माणसांसाठी लिहिले गेले आहे, त्याला आपण साहित्य म्हटले पाहिजे. नुसत्या गाडग्या-मडक्यांच्या उतरंडी रचल्याप्रमाणे शब्दांची उतरंडी रचणे आणि मी कवी आहे असे म्हणणे सोडून दिले पाहिजे.
डॉ. नीलिमा गुंडी म्हणाल्या, हनुमंत चांदगुडे यांच्या काव्यात निर्मितीचा एक वेग आहे, तो आवेग सत्य मांडत आहे. प्रत्येक कलाकार त्याच्या संचितातून कलेकडे पाहत असतो आणि त्यातून सत्य, शिव आणि सौंदर्य ही मूल्ये उलगडत जातो. भाषा, कविता आणि संस्कृती ही घट्ट वीण असते तिच कवितेची ताकद होते, हे मनातून विसरायचे नाही.
ॲड. प्रमोद आडकर यांनी उपक्रमाविषयी अवगत केले. वैजयंती आपटे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित ‘मल्हारधून’ या कवितांच्या कार्यक्रमात बंडा जोशी, माधव हुंडेकर, प्रभा सोनवणे, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, मिना शिंदे, प्रतिभा पवार, विजया गुळवणी, अनुराधा काळे, मृणाल जैन, डॉ. ज्योती रहाळकर, धनंजय तडवळकर यांचा सहभाग होता.
फोटो ओळ : रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित सन्मान सोहळ्यात (डावीकडून) मैथिली आडकर, ॲड. प्रमोद आडकर, हनुमंत चांदगुडे, डॉ. नीलिमा गुंडी, प्रज्ञा महाजन.
प्रति,
मा. संपादक
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे शेतकरी कवी हनुमंत चांदगुडे यांचा सोमवारी (दि. ३) विशेष सन्मान करण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
ॲड. प्रमोद आडकर, अध्यक्ष, रंगत-संगत प्रतिष्ठान
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
