August 4, 2026

राम कृष्ण हरी’ च्या गजरात ‘दगडूशेठ’ चातुर्मास कीर्तन महोत्सवाचा शुभारंभश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन

0
IMG-20260802-WA0054
Spread the love


पुणे : टाळ मृदुंगाचा गजर, मंत्रमुग्ध करणारे अभंग, ज्ञानोबा तुकोबांचे जीवन विषयक तत्त्वज्ञान सांगणारे कीर्तनकारांची अमोघ वाणी आणि जय जय राम कृष्ण हरी चा गजर अशा पवित्र आणि भक्तिमय वातावरणात ‘दगडूशेठ’ चातुर्मास कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नाशिक येथील वारकरी भूषण श्रीगुरु ह.भ.प.चैतन्य महाराज निंबोळे यांचे कीर्तन झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ट्रस्टचे व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. समाजभूषण शांताराम महाराज निमन, अरुण पवार, उद्धव गोळे, वैभव महाराज साखरे, जयवंत चांदेरे, राधाकृष्ण गुरुजी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

चैतन्य महाराज निंबोळे म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचा चातुर्मासानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणारा कीर्तन महोत्सव हा सर्वांसाठी एक सांस्कृतिक पर्वणी आहे. या महोत्सवामध्ये आल्यानंतर ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांची निश्चितच आठवण येते, त्यांची परंपरा पुढे सुरू ठेवण्याची संधी प्रश्न मला दिली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानतो.

प्रास्ताविकात महेश सूर्यवंशी म्हणाले, नुकतीच आषाढी वारी झाली आणि प्रथेप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यंदा या महोत्सवाचे ४० वे वर्ष आहे . वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची ही आम्हाला एक संधी आहे. आपल्या संतांनी दिलेली शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्याचे अनुकरण समाजामध्ये व्हावे या उदात्त हेतूने हा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येतो.

दररोज सायंकाळी ५.३० वाजता अनुक्रमे आळंदी येथील ज्ञानेश्वरी कंठभूषण ह.भ.प.ओंकार महाराज दुडे शास्त्री, आळंदी साधकाश्रम येथील ह.भ.प.यशोधन महाराज साखरे, पंढरपूर येथील संत नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज ह.भ.प.केशव महाराज नामदास, डोंबिवली येथील श्रीमलंग गड येथील आॅनलाईन कीर्तन गुरुकुलाचे संस्थापक ह.भ.प. जयेश महाराज भाग्यवंत, परभणी मानवत येथील वारकरीभूषण ह.भ.प. उमेश महाराज दशरथे आणि पंढरपूर येथील मानकोजी महाराज बोधले यांचे ११ वे वंशज ह.भ.प.डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन ऐकण्याची संधी मिळणार आहे.

शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी जगद्गुरु फाऊंडेशनचे संस्थापक जगद्गुरुकृपांकित ह.भ.प.डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. तसेच महोत्सवाचा समारोप रविवार, दि. ९ आॅगस्ट रोजी होणार असून ह.भ.प. भावार्थ महाराज देखणे यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल. महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत कीर्तनकारांना ऐकण्याची व यामाध्यमातून स्वरब्रह्माची अनुभूती घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. महोत्सवाला प्रवेश खुला असून कीर्तनांचा पुणेकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. राजाभाऊ घोडके यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी