एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन
- पुण्यातील चौथे दालन; ‘राजवाडा’मध्ये ग्राहकांना मिळणार पारंपरिक व दुर्मिळ डिझाईन्सचे दागिने
पुणे, ता. २०: मागील ७५ वर्षांपासून पुणेकरांच्या पसंतीस उतरलेल्या एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या पाचव्या दालनाचे आज (२० सप्टेंबर) रविवारी बाणेरमध्ये उद्घाटन करण्यात आले. बाणेर-म्हाळुंगे रोडवर असलेल्या या दालनामुळे लगतच्या परीसरातील ग्राहकांना आता नगरकर ज्वेलर्सच्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांची खरेदी करता येणार आहे. उद्घाटनाप्रसंगी वसंत नगरकर, स्वाती वल्लभ नगरकर, वासंती वसंत नगरकर, प्रसाद नगरकर, पुष्कर नगरकर, प्रियांका नगरकर, अनघा नगरकर, पूजा नगरकर कुलकर्णी, रोहन कुलकर्णी, कुहू नगरकर उपस्थित होते.
कायनेटीक ग्रुपच्या संचालिका जयश्री फिरोदिया, उद्योजक जगदीश कदम व मोहना कदम, एम. बी. पाटील व संगिता पाटील या नगरकर ज्वेलर्सच्या मान्यवर ग्राहकांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन करण्यात आले. सामाजिकतेचे भान राखत नगरकर ज्वेलर्सकडून तीन सामाजिक संस्थांना प्रत्येकी एक लाखाची अर्थिक मदत करण्यात आली. यामध्ये कर्णबधिर मुलांच्या पुर्नवसनासाठी कार्यरत सुहृद फाऊंडेशन, वंचित घटकांसाठी काम करणारी वंचित विकास व सोलापूर येथील संस्कार संजीवन या संस्थांचा समावेश आहे. सुहृद फाऊंडेशनच्या अनुराधा पाथरफोड व गौरी लेले, वंचित विकासचे विजयकुमार मर्लेचा, देवयानी गोंगले व मिनाक्षी नवले, संस्कार संजीवन फाऊंडेशनचे परमेश्वर काळे व संदिप तिरकुंडे यांनी धनादेश स्वीकारला.
जयश्री फिरोदिया यांनी दालनाच्या भव्यतेचे तसेच दागिन्यांच्या वैशिष्टयपूर्ण घडणावळींचे कौतुक केले. नगरकर परिवाराने परंपरेचा साजाला उत्कृष्टतेची जोड देत आपली वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. जगदीश कदम यांनीही नगरकर ज्वेलर्सचे कौतुक करताना व्यवसायासोबतच सामाजिकतेचे भान जपणारे हे कुटुंब असल्याचा विशेष उल्लेख केला. सात दशकांपूर्वी सुरू झालेल्या या व्यवसायाला वल्लभ आणि वसंत नगरकर यांच्यानंतर नवी पिढी जोमाने पुढे नेत आहे. ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य देणाऱ्या नगरकर ज्वेलर्सचा विस्तार देशभर व्हावा, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वसंत नगरकर म्हणाले, “श्रीपाद नगरकर यांनी १९५२ मध्ये श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सची मुहूर्तमेढ रोवली. आता नगरकरांची तिसरी पिढी प्रसाद आणि पुष्कर या अँटिक, युनिक दागिन्यांची परंपरा पुण्यासह राज्यातील इतर शहरांत घेऊन जाण्यासाठी मेहनत करत आहेत. हा परंपरागत व्यवसाय असून पारंपरिक आणि शुद्ध दागिने ही आमची खासियत आहे. शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना ग्राहकांना आपण राहत असलेल्या ठिकाणी खरेदी करणे सोपे व्हावे यादृष्टीने बाणेरमध्ये शाखा सुरू करत आहोत.”
प्रसाद नगरकर म्हणाले, “नगरकर ज्वेलर्सचा येत्या काळात पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्याचा आमचे नियोजन आहे. पारंपरिक दागिन्यांसोबतच आर्या कलेक्शनमध्ये विविध प्रकारचे दागिने उपलब्ध होणार आहेत. याशिवाय काही वर्षांपूर्वीच सुरू केलेल्या राजवाडा या विशेष संकल्पनेअंतर्गत एलिट क्लासचे दागिने घडवण्यात येतात, यात एक डिझाईन एकदाच घडवले जाते व ते एक्स्लुझिव्ह असते. हे राजवाडा दालन खरेदीसाठीच नाही तर पाहण्यासाठीही अतिशय आकर्षक अशी रचना असलेले आहे.”
पुष्कर नगरकर म्हणाले, “पुण्यातील तुळशीबाग, लक्ष्मी रोड, कोथरुड आणि ठाणे येथील ग्राहकांना दिलेल्या विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवेनंतर आता बाणेर येथे नवीन दालन सुरू झाले आहे. नाविन्यपूर्ण दागिन्यांची पर्वणी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. सोने, चांदी, हिरे यातील पारंपरिक आणि फ्युजन दागिन्यांचे असंख्य प्रकार आपल्याकडे आहेत. कमी वजनापासून ते जास्त वजनापर्यंतचे सर्व दागिने येथे मिळणार आहेत.”
या दालनात सोने, चांदी, हिरे, पोल्की यातील नाविन्यपूर्ण दागिने येथे आहेत. पारंपरिक दागिने, बकुळी, पोहे हार, ठुशी, श्रीमंत हार, कोल्हापुरी साज, वज्र टीका, चंद्रहार, मोत्यांचे दागिने, फ्युजन डिझाईनचे कुंदन नेकलेस, गेरू नेकलेस, नकास वर्क, मोती कुंदन, गहू तोड्याचे नेकलेस राणी व लक्ष्मीहार अशा असंख्य दागिन्यांची गुंफण येथे असणार आहे. याशिवाय चांदीचे देवघर, देवदेवतांच्या मुर्ती, सोफासेट असे दुर्मिळ प्रकारही ग्राहकांना उपलब्ध होतील, असेही नगरकर यांनी सांगितले.
