September 12, 2026

आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखाज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा तरुणाईला सल्लापुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा साजरा

0
IMG-20260911-WA0061(3)
Spread the love

पुणे : कलाक्षेत्रात वाटचाल करताना, शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. विविध कौशल्ये आत्मसात करा आणि आपल्याला आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखून पुढे जा, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी शुक्रवारी येथे तरुणाईला दिला. पारितोषिक स्वीकारताना ‘आवाज कुणाचा’, ‘आमचे नाटक आम्हीच बसवितो’, ‘आमचे नाटक आम्हीच लिहितो’, पुंडलिक वरदे हारी विठ्ठल’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.

निमित्त होते, महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ६१व्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे. भरत नाट्य मंदिरात झालेल्या समारंभात भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते विजेत्या संघांना पुरस्कारांचे वितरण झाले. त्या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी भावनिक संवाद साधला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण तसेच पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील विद्यार्थी लेखकांच्या संहितांचा अभ्यास करून त्यावरील प्रबंध सादर करणारे डॉ. विजयकुमार जोशी यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर, उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी, प्राथमिक फेरीचे परीक्षक प्रसाद शिरगावकर, अमृत सामक, अंतिम फेरीचे परीक्षक निपुण धर्माधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
कार्यक्रमात सुरवातीला पुरुषोत्तम करंडक पटकाविणारी भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌ची ‘लाजाळू’ एकांकिका सादर झाली. पुरुषोत्तम करंडक प्राप्त ‘लाजाळू’ या एकांकिकेचे सादरीकरण झाले.
प्रशांत दामले यांनी परिपूर्ण कुणीच नसते, त्यामुळे एकमेकांच्या मदतीने एकमेकांना साह्य करत पुढे जा, असा सल्ला मनोगतातून दिला. स्वतःच्या कलाप्रवासाचे उदाहरण देत ते म्हणाले, मी १९७८ ते १९८२ पर्यंत मॉब आर्टिस्ट म्हणून काम केले आणि तो काळ खूप शिकवणारा होता. प्रेक्षकांच्या खऱ्या प्रतिक्रिया तिथेच समजतात. टुरटूर नाटकाच्या निमित्ताने रंगदेवतेची कृपा झाली आणि माझा प्रवास सुरू झाला. उत्तम निर्माते आणि सहकलाकार मिळाले. कोणत्याही परिस्थितीत चिकाटीने काम करणे, स्पर्धेचे भान ठेवणे, एकाग्रता या घटकांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. रंगमंचावरचे आपले बोलणे स्वतः नीट ऐकले पाहिजे, पाठांतर चोख हवे आणि बोललेल्या प्रत्येक वाक्यातील शेवटचे अक्षर सुस्पष्टपणे ऐकू आले पाहिजे, ही पथ्ये पाळणे अपरिहार्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

परीक्षकांच्या वतीने शिरगावकर, सामक आणि निपुण धर्माधिकारी यांनी मनोगत मांडले. विषयांचे, आशय़ांचे वैविध्य, तांत्रिक सफाई, विद्यार्थी लेखकांचे आधिक्य, परिपक्व हाताळणी अशा घटकांचे परीक्षकांनी कौतुक केले. स्वतःमधील कलाकार घडवणारे हे व्यासपीठ आहे, असे शिरगावकर म्हणाले. कलोपासक संस्थेचा हा उपक्रम स्पर्धेपुरता न घेता, स्वतःचे हक्काचे व्यासपीठ समजा आणि आपले आजचे स्पर्धक हे आपले उद्याचे सहकारी आहेत, या भावनेने काम करा, असे धर्माधिकारी म्हणाले. योगेश सोमण आणि डॉ. विजयकुमार जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. कलोपासक चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकुरदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : महाराष्ट्रील कलोपासक आयोजित आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारा भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाइन आर्टस्‌चा संघ. समवेत प्रशांत दामले, अनंत निघोजकर, डॉ. सुहास जोशी, प्रसाद शिरगावकर, अमृत सामक, निपुण धर्माधिकारी, योगेश सोमण, डॉ. विजयकुमार जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी