September 12, 2026

विदुषी सानिया पाटणकर यांच्या शिष्यांची रंगली संगीतसंध्याप्रेरणा म्यूझिक ऑर्गनायझेशनतर्फे आयोजन ‍

0
IMG-20260911-WA0031
Spread the love


पुणे : मोजका वेळ तरीही भारतीय रागसंगीताचे तयारीचे सादरीकरण, असे समीकरण जपणारी विद्यार्थ्यांची संगीतसंध्या गुरुवारी रसिकांनी अनुभवली. प्रसिद्ध गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने, ‘प्रेरणा म्यूझिक ऑर्गनायझेशन’ संयोजित या कार्यक्रमात सुमारे २५ विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. तसेच भोपाळ येथील प्रसिद्ध गायक पं. शेखर करहाडकर यांचेही गायन रंगले.

कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी कॉलेजच्या पीजीएसआर सभागृहात गुरुवारी रंगलेल्या या संगीतसंध्येत सुरवातीला सानिया पाटणकर यांच्या विदेशांतील शिष्यांनी दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरण केले. अतिथी कलाकार म्हणून भोपाळ येथील प्रसिद्ध गायक पं. शेखर करहाडकर यांनी प्रस्तुती केली. तूच गजानन, अविरत ओठी यावे नाम, पद्मनाभा नारायणा तसेच दत्तस्तुतीपर रचनांनी त्यांनी भक्तीरसपूर्ण वातावरणनिर्मिती केली. सानिया पाटणकर यांच्या गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या संगीतसंध्येत गुणी विद्यार्थ्यांचा संगीत परिवार भेटल्याची भावना पं. करहाडकर यांनी व्यक्त केली.

उत्तरार्धात सानिया पाटणकर यांच्या विविध वयोगटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्यांनी मोजक्या वेळात भारतीय रागसंगीताचे विविध रंग निरनिराळ्या रागांतील बंदिशींच्या माध्यमातून उलगडले. पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद आणि स्वित्झर्लंड, जर्मनी, अमेरिका, कॅनडा अशा देशांमधून गुरु-शिष्य परंपरेमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केदार, तिलककामोद, बिहागडा, सारंग, ललितागौरी, गौडमल्हार, जौनपुरी, भीमपलास, अल्हैयाबिलावल, यमन, प्रतीक्षा अशा अनेक रागांतील बंदिशींचे जणु अर्घ्यच गुरुंप्रती अर्पण केले. एकल सादरीकरण हे या संगीतसंध्येचे वैशिष्ट्य ठरले. रागसंगीताच्या जोडीने काही विद्यार्थ्यांनी ललित संगीताचीही प्रस्तुती केली. हरी म्हणा कुणी गोविंद म्हणा, कानडा राजा पंढरीचा, माझे माहेर पंढरी, इक राधा इक मीरा अशा लोकप्रिय रचनाही सादर झाल्या.

विदुषी सानिया पाटणकर यांनी प्रेरणा म्यूझिक ऑर्गनायझेशनच्या विविध कलाविषयक उपक्रमांची माहिती सांगितली. प्रत्येक विद्यार्थ्यांला एकल सादरीकरणाची संधी आवर्जून दिली जाते. संस्थेत सामाजिक सांगितिक अनेक उपक्रम सुरू असतात असे त्यांनी नमूद केले. वेदवती परांजपे, करिष्मा टापरे आणि नितीन महाबळेश्वरकर यांनी सूत्रसंचालन केले. कुमार करंदीकर, अंशुल प्रतापसिंग, विशाल मोरे व सुधीर टेकाळे यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी