अशोक कोठावळे यांना दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार३ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : पुण्यातील दिलीपराज प्रकाशनच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्काराने मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक, ज्येष्ठ ग्रंथ वितरक अशोक कोठावळे (मुंबई) यांचा गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. ५० वर्षांपेक्षा जास्त काळ ग्रंथसेवा करणाऱ्यांना सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्काराने दरवर्षी गौरविण्यात येते. पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष असून मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, प्रसिद्ध नाटककार सतिश आळेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याच कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक शरणकुमार लिंबाळे लिखित ‘दलित फाईल्स’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
अशोक कोठावळे यांनी केशवराव कोठावळे यांचा प्रकाशन व्यवसायाचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे. ते १९८३ पासून ‘दिवाळी’ आणि ‘ललित’ या प्रसिद्ध अंकांचे संपादक म्हणून काम पाहत आहेत. मुंबई आणि पुण्यात त्यांनी ‘मॅजेस्टिक गप्पा’ हा उपक्रम सुरू करून लेखक व वाचकांचा संवाद वाढवला. ‘आठवणींची साठवण’ आणि ‘सहवास प्रतिभावंतांचा’ यासारख्या पुस्तकांचे लेखन केले आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : अशोक कोठावळे
प्रति,
मा. संपादक
दिलीपराज प्रकाशनच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्कार समारंभाच्या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
मधुर बर्वे, संचालक, दिलीपराज प्रकाशन
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
