September 7, 2026

सूर संतोष संगीत सुधा’ मैफल ठरली संस्मरणीयविदुषी सहाना बॅनर्जी यांचे सतारवादन तर पंडित रघुनंदन पणशीकर यांचे गायन

0
IMG-20260816-WA0017
Spread the love


पुणे : विदुषी सहाना बॅनर्जी यांच्या सतार वादनातून उमटलेले झंकार आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या स्वर्गीय सुरातून रसिकांची सायंकाळ संस्मरणीय ठरली. निमित्त होते ‘सूर संतोष संगीत सुधा’ या गायन-वादन मैफलीचे!
‘स्वरसुधा’तर्फे संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने सुप्रसिद्ध सतार व सूरबहारवादक पंडित संतोष बॅनर्जी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील गणेश सभागृहात मैफल रंगली.
कार्यक्रमाची सुरुवात रामपूर-सेनिया घराण्याच्या वारसदार असलेल्या आणि समृद्ध संगीताचा कौटुंबिक वारसा लाभलेल्या विदुषी सहाना बॅनर्जी यांनी राग मियाँ की मल्हार ऐकवून केली. यात आलाप, जोड आणि झाला सादर करताना त्यांची संगीताप्रती असलेली निष्ठा, तांत्रिक वैशिष्ट्ये आणि सौंदर्यदृष्टीची झलक पहावयास मिळाली. गायकी अंग, नजाकत, माधुर्याचा मिलाफ असलेल्या राग तिलक कामोदच्या सादीकरणाने त्यांनी रसिकांना मोहित केले. युवा तबलावादक महेशराज साळुंके यांनी सुरेल तबलासाथ करून मैफलीत रंग भरले.
मैफलीच्या उत्तरार्धात जयपूर-अत्रौली घराण्याचे विख्यात गायक पंडित रघुनंदन पशणीकर यांची गायन मैफल रंगली. त्यांनी राग यमनमधील गुरू, गानसरस्वती, पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांनी रचलेली ‘मोरे मन लगन लागी’ ही बंदिश सादर करून रसिकांना स्वर्गीय सुरांचा आनंद दिला. त्याला जोडून द्रुत तालातील ‘ए रि आली पियाबिन’ ही पारंपरिक रचना ऐकविली. रागावरील सुरेल पकड, सादरीकरणातील प्रभुत्व लाभलेल्या पंडित पणशीकर यांच्या गायनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. पंडित भरत कामत (तबला), अमेय बिच्चू (संवादिनी), अपर्णा पणशीकर (तानपुरा), सौरभ काडगावकर, राधिका जोशी (सहगायन, तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.
या निमित्ताने पंडित संतोष बॅनर्जी यांच्या सांगीतिक कार्याविषयी माहिती देणारा ‘सूरसाधना : अ जर्नी ऑफ अ मेलोडिक सेंट’ हा मृण्मय नंदी दिग्दर्शित लघुपट दाखविण्यात आला. पंडित संतोष बॅनर्जी यांच्या सांगितीक क्षेत्रातील योगदानाला रसिकांनी मानवंदना दिली.
कलाकारांचा सन्मान मनाली गाडगीळ, अमित बॅनर्जी यांनी केला. शिरीष कौलगुड यांनी ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले.
फोटो : सहाना बॅनर्जी
फोटो : पंडित रघुनंदन पणशीकर
प्रति,
मा. संपादक
‘स्वरसुधा’तर्फे संगीत नाटक अकादमीच्या सहकार्याने सुप्रसिद्ध सतार व सूरबहारवादक पंडित संतोष बॅनर्जी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘सूर संतोष संगीत सुधा’ या गायन-वादन मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
सहाना बॅनर्जी, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी