ज्ञानदेव संगीत महोत्सवातून गायन, नृत्याची पर्वणी
पुणे : विदुषी सानिया पाटणकर यांचे बहारदार गायन, प्रसिद्ध नृत्यांगना मुक्ती श्री यांचा मोहक पदन्यास आणि अभिनवगंधर्व पं. रघुनाथ खंडाळकर यांच्यासह शुभम व सुरंजन खंडाळकर यांचे सुश्राव्य गायन यातून ज्ञानदेव संगीत महोत्सवात रंगत आली.
विलास जावडेकर डेव्हलेपर्स प्रस्तुत अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आणि उर्मी फौंडेशनतर्फे ज्ञानदेव संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचे यंदाचे हे नववे वर्ष होते. सारथी ऑडिटोरियम, बीएमसीसी रस्ता, पुणे येथे रविवारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ संगीतकार गुरुवर्य पंडित म. ना. कुलकर्णी यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने विदुषी सानिया पाटणकर यांचा गौरव करण्यात आला. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि तुळशी रोप असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे वितरण पं. रघुनंदन पणशीकर, पं. हेमंत पेंडसे, पं. रघुनाथ खंडाळकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी रवींद्र कुलकर्णी, दत्तात्रय मारणे मंचावर उपस्थित होते.
महोत्सवाची सुरुवात विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायन मैफलीने झाली. त्यांनी सुरुवातीस गौड मल्हार रागातील जयपूर घराण्यातील ‘मानन करिये’ ही पारंपरिक बंदिश सादर केली. त्यानंतर ‘बरखा बैरी भयो सजनिया’ ही बंदिश प्रभावीपणे सादर करत पंडित सी. आर. व्यास रचित ‘उमड घन गगन आयोरे’ ही रचना ऐकविली. मैफलीची सांगता राग प्रतिक्षा (भुपेश्र्वरी) मधील गुरू डॉ. अश्र्विनी भिडे-देशपांडे रचित ‘कारी बदरिया’ या साडेसात मात्रांमध्ये बांधलेल्या बंदिशीने केली. बहारदार ताना, सुमधुर आवाज, लयतालावरील पकड यांचा अनोखा आविष्कार रसिकांना आनंदीत करून गेला. आशय कुलकर्णी (तबला), माधव लिमये (संवादिनी), ऋची शिरसे, मनिषा पिंपळगावकर, क्रांतिशीला ठोंबरे (तानपुरा, सहगायन) यांनी समर्पक साथ केली.
त्यानंतर सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना मुक्ती श्री यांच्या पदलालित्याने नृत्यमैफल अधिकाधिक रंगत गेली. मुक्ती श्री यांनी नृत्याची सुरुवात गणेश वंदनेने करून ताल झपताल मध्ये आमद, परण आमद, गिनती, तिहाई, शिवपरण आणि दुर्गापरण सादर केले. पखवाज आणि घुंगरांच्या बोलातील जुगलबंदी रसिकांना विशेष भावली. अभिनयपक्ष सादर करताना मुक्ती श्री यांनी कृष्णावरील रचित ‘सपने मे आए शाम’ या बंदिशीवर अनोखा नृत्याविष्कार सादर करत कृष्ण व गोपिकांमधील तरल संवेदनांची भावनुभूती दर्शविली. आशय कुलकर्णी (तबला), ओंकार दळवी (पखवाज), अन्वी श्री, आयुषी दीक्षित (पढंत), अभिषेक शिनकर (संवादिनी), सुरंजन खंडाळकर (गायन) यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाची सांगता अभिनवगंधर्व पं. रघुनाथ खंडाळकर आणि त्यांचे चिरंजीव सुरंजन व शुभम खंडाळकर यांच्या गायन मैफलीने झाली. अभंगवाणी सादर करताना पं. रघुनाथ खंडाळकर यांनी संगीतबद्ध केलेल्या संत तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत मिराबाई आणि संत कबीर यांच्या रचना प्रभावीपणे सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाला सुप्रसिद्ध कीर्तनकार रोहिणी माने-परांजपे यांचे ओघवत्या शैलीतील निवेदन लाभले. ‘अखंड जया तुझी प्रिती मज दे तयाची संगती’, ‘सावळे रुपडे चोरटे चित्ताचे’, ‘गोड लागे परी’, ‘याच्या मुरलीचा वेध लागला’, ‘राधे देवो बासुरी मोरि सुरिली’, ‘ये तनू मुंडना, आखिर मिट्टी मे मिल जाना’ या रचनांनी भक्तीमय रसाची निर्मिती करून रसिकांना तृप्त केले. पं. प्रताप पाटील (पखवाज), पांडुरंग पवार (तबला), अनिल भुजबळ (टाळ) यांनी समर्पक अशी साथसंगत केली.
कलाकारांचा सन्मान पं. रघुनाथ खंडाळकर, संध्या खंडाळकर, मधुकर शिंदे, तानाजी लोहकरे, लहु लोहकरे यांच्या हस्ते करण्यात आला. स्वानंद पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : ज्ञानदेव संगीत महोत्सवात (डावीकडून) पांडुरंग पवार, सुरंजन खंडाळकर, पं. रघुनाथ खंडाळकर, शुभम खंडाळकर, पं. प्रताप पाटील.
प्रति
मा. संपादक
अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आयोजित आणि उर्मी फौंडेशन यांच्या सहकार्याने ‘ज्ञानदेव संगीत महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला होता. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
सुरंजन खंडाळकर, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
