August 10, 2026

-मंडई म्हसोबा उत्सवात तुळजाभवानी माता मूर्तीची भव्य पुष्पआरासअखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव ; धार्मिक कार्यक्रमांनी प्रारंभ

0
IMG-20260810-WA0042
Spread the love

पुणे : श्री तुळजाभवानी माता मूर्तीच्या विविधरंगी फुलांनी साकारलेल्या २५ फूट उंचीच्या भव्य पुष्पसजावटीमध्ये म्हसोबाराया विराजमान झाले. शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या निमित्ताने ही आरास करण्यात आली आहे. प्रारंभी श्रीं चा रुद्राभिषेक व रुद्रयाग, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाला थाटात प्रारंभ झाला.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी नगरसेविका स्वप्नाली नितीन पंडित, वीणा गणेश घोष यांच्या हस्ते श्रीं चा रुद्राभिषेक व रुद्रयाग पार पडले. तर, दुपारी भिंताडे उद्योग समूहाच्या शालन भिंताडे, पृथ्वी भिंताडे यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती झाली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मंडई म्हसोबा मंदिराच्या परिसरात पुष्पसजावटीसोबतच विविधरंगी विद्युतरोषणाई देखील करण्यात आली असून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात साकारण्यात आलेल्या २५ फूट उंचीच्या श्री तुळजाभवानी माता मूर्तीच्या पुष्पप्रतिकृतीसोबतच विविध प्रकारची आरास देखील साकारण्यात आली आहे. याकरिता विविध प्रकारची फुले वापरण्यात आली असून सुभाष सरपाले यांच्या मार्गदर्शनाखाली कारागिरांनी ही आरास साकारली आहे. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे या उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.

धार्मिक उत्सवासोबतच विधायक उपक्रम हे उत्सवाचे वैशिष्टय आहे. उत्सवात महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन संलग्न पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने तसेच पिंपरी चिंचवड शरीर सौष्ठव संघटना व बॉडी बिल्डिंग अ‍ँड फिजिक्स स्पोर्टस् पुणे यांच्या सहकार्याने वेनकॉब पुणे श्री २०२६ ही ७ वजनी गटातील जिल्हास्तरीय खुली शरीरसौष्ठव स्पर्धा, दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव व महाआरती, सुमारे १ हजार गरजू विद्यार्थ्यांना एकूण २ लाख ५१ हजार रुपयांचे शालेय साहित्य प्रदान कार्यक्रम, महिलांसाठी होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा व चालता बोलता हा कार्यक्रम होणार असून १४ लकी ड्रॉ होणार आहेत. तर, उत्सवाची सांगता पुरस्कार वितरण सोहळा व सायंकाळी महाआरतीने होणार आहे.

उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी व सायंकाळी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील होणार आहे. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट पुणे या ट्रस्टच्या फेसबुक पेजवरुन हा उत्सव भाविकांना पाहता येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

  • फोटो ओळ : शुक्रवार पेठेतील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टचा म्हसोबा उत्सव महात्मा फुले मंडई, बुरुड आळी येथे आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या प्रारंभी श्रीं चा रुद्राभिषेक व रुद्रयाग पार पडले. तसेच मंदिराला करण्यात आलेली श्री तुळजाभवानी माता मूर्तीची २५ फूट आकर्षक पुष्पप्रतिकृती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी