August 11, 2026

समाजातील सेवाभाव जपण्याची गरज – (नि) विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव

0
IMG-20260809-WA0048
Spread the love

सुजय फाउंडेशन आणि मैत्री रक्ताची तर्फे रक्तदान व मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

पुणे, दि. ९ (प्रतिनिधी) : स्वतःच्या मुलाचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्यानंतरही त्या दुःखावर मात करून सुरेश सकपाळ यांच्या सुजय फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेली समाजसेवा प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रमाणेच समाजातील सेवाभाव जपण्याची आज नितांत गरज आहे. पैसा आणि पद नसतानाही सामाजिक कार्य करता येते, याची प्रेरणा सुरेश सकपाळ यांच्या कार्यातून प्रत्येकाने घ्यावी, असे मत निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केले.

सुजय फाउंडेशन आणि मैत्री रक्ताची यांच्या वतीने सुजय सकपाळ यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आयुर्वेदिक तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विठ्ठल जाधव बोलत होते.

यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अप्पर आयुक्त शिवकुमार साळुंखे(आई.आर.एस), महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम, उद्योजक किसन भोसले,विद्याताई जाधव, कस्टम अधिकारी स्नेहल खैरे, अप्पर राज्यकर आयुक्त उमाकांत बिराजदार, सुधीर सकपाळ, उमेश सकपाळ,सुजय प्रतिष्ठानचे प्रमुख सुरेश सकपाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सुजय फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ११७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

तसेच समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी ‘सेवा रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यामध्ये उद्योजक किसन भोसले, उमाकांत बिराजदार, सागर घोरपडे, शैलेश पालकर, विठ्ठल जाधव आणि उषा म्हात्रे यांचा समावेश होता.

तसेच संतोष जाधव, डॉ. सुरेश राठोड, हरिभाऊ शिवले, मधुकर चौधरी, उज्ज्वला गौड, किरण सावंत, विजय ठुबे, श्याम झवर यांच्यासह श्री काळभैरवनाथ फाउंडेशन, होय हिंदू आणि आदर्श सेवा मंडळ या संस्थांना ‘समाज गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

विठ्ठल जाधव म्हणाले, “सुरेश सकपाळ यांनी समाजकार्याला वाहून घेतले आहे. त्यांचा मुलगा सुजय सकपाळ याचे कर्करोगामुळे निधन झाले. मात्र, समाजातील इतर कोणालाही आपल्या कुटुंबाप्रमाणे दुःख भोगावे लागू नये, तसेच गरजू रुग्णांना कायमस्वरूपी रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने त्यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवले आहे. स्वतःच्या दुःखाचे समाजसेवेत रूपांतर करणे ही मोठी प्रेरणादायी बाब आहे.”

मेघराज राजेभोसले म्हणाले, “स्वतःच्या मुलाच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून सुरेश सकपाळ समाजासाठी काम करत आहेत, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. त्यांनी समाजालाच आपले कुटुंब मानले आहे. या भावनेतून सुरू असलेली समाजसेवा हीच सुजयला खरी श्रद्धांजली ठरेल.”

निलेश निकम म्हणाले, “सुरेश सकपाळ यांच्याकडे स्वतःचे घर नाही. आजही भाड्याच्या घरात राहून ते समाजासाठी काम करत आहेत. त्यांची ही सेवावृत्ती प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.”

उमाकांत बिराजदार म्हणाले, “एक रक्तदाता तीन जणांचे प्राण वाचवू शकतो. धकाधकीच्या जीवनात नियमित आरोग्य तपासणीही तितकीच गरजेची आहे. ही गरज ओळखून सुरेश सकपाळ यांनी घेतलेला पुढाकार समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे.”

किसन भोसले म्हणाले, “सुजय सकपाळ यांच्या आजारपणाचा मी स्वतः साक्षीदार आहे. एखादा वडील मुलाच्या मृत्यूने पूर्णपणे कोलमडून पडला असता. मात्र, सुरेश सकपाळ यांनी केवळ स्वतःला सावरले नाही, तर समाजालाही आरोग्याच्या दृष्टीने सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.”

सुनील मोरे म्हणाले, “पद आणि पैशाने माणूस मोठा होत नाही. जो माणूस योग्य वेळी समाजाच्या मदतीला धावून येतो, त्याची खरी उंची वाढते.”

शिवकुमार साळुंखे म्हणाले, “सुरेश सकपाळ यांनी एक प्रकारे शिवधनुष्य हाती घेतले आहे. स्वतःचे दुःख बाजूला ठेवून समाजाला वाहून घेणे ही साधी गोष्ट नाही. प्रशासकीय पातळीवर त्यांना आवश्यक असलेली मदत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.”

रामदास माने म्हणाले, “‘जैसे निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेथे मिळेल फळ’ या तुकाराम महाराजांच्या विचारांप्रमाणे सुरेश सकपाळ यांची वाटचाल सुरू आहे. ते ज्या प्रकारचे समाजकार्य करत आहेत, ते प्रामुख्याने शासनाचे काम आहे. मात्र, शासनाची वाट न पाहता स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा त्यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच सर्वांसाठी आदर्श आहे.”

यावेळी आयुरनिर्माण हेल्थ फाउंडेशन आणि एसएलएस वेलनेस यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर तसेच मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. तसेच उपस्थित नागरिकांची आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्य तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर भंडारी यांनी केले, तर सुरेश सकपाळ यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी