कर्म, ज्ञान आणि भक्तीचे मार्ग भगवंतापर्यंत घेऊन जातातमानकोजी महाराज बोधले यांचे ११वे वंशज ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मास कीर्तन महोत्सव आयोजन
पुणे : कर्म, ज्ञान आणि भक्ती हे तिन्ही मार्ग आपल्याला एका परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारे आहेत. जिथे पोहोचायचे तो एक भगवंत आहे ; पण ज्याच्या माध्यमातून पोहोचायचे ते अनेक आहेत. कर्मामध्ये परम तत्त्वापर्यंत जाण्याचे सामर्थ्य आहे आणि हे कर्म आपल्याला नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत घेऊन जाते, असे प्रतिपादन मानकोजी महाराज बोधले यांचे ११वे वंशज ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले म्हणाले, एकंदरीत कीर्तन आणि भक्ती या शब्दांचा विचार करत असताना नवविधा भक्तीमध्ये कीर्तन भक्तीचा विशेषत्वाने उल्लेख आपल्याला दिसून येतो. श्रवणम्, कीर्तनं विष्णोः, स्मरणं, पादसेवनम्, अर्चनं, वंदनं, दास्यं, सख्यम्, आत्मनिवेदनम् हा भक्त प्रल्हादाच्या मुखातला, श्रीमद् भागवतातला श्लोक अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यामध्ये द्वितीय क्रमांकाची कीर्तन भक्ती सांगितली आहे.
कीर्तन हे काय आहे, हे कळण्याआधी भक्ती म्हणजे काय समजले पाहिजे. त्याकरिता तीन मार्गांचा विचार केला पाहिजे. एक कर्म नावाचा मार्ग आहे, दुसरा ज्ञान नावाचा मार्ग आहे आणि तिसरा भक्ती नावाचा मार्ग आहे. या तीनही मार्गांचा विचार भगवद्गीतेमध्ये आणि पर्यायाने ज्ञानेश्वरीमध्ये विस्ताराने आलेला आपल्याला दिसून येतो.
ते पुढे म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबारायांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान समाजापर्यंत पोहोचावे, या उदात्त हेतूने हा कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे. या चातुर्मास महोत्सवाची ख्याती अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायात आहे. यावर्षी माझ्याकडेही परम भाग्याने कीर्तनाची सेवा प्राप्त झालेली आहे.
