August 10, 2026

संयोजकाच्या मंचावर रंगला संयोजकाचा हृद्य सन्मान सोहळा..!रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे डॉ. किशोर सरपोतदार यांचा आदर्श संयोजक पुरस्काराने गौरवपुणे : सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या ३५ वर्षांत पंधराशेपेक्षा जास्त सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम घेणाऱ्या रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सुमारे ४५ वर्षांची परंपरा असलेल्या पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचाचे संयोजक डॉ. किशोर सरपोतदार यांचा आज (दि. ९) आदर्श संयोजक पुरस्काराने गौरव करण्यात आला. सुहृदांच्या उपस्थितीत रंगलेला हा सोहळा अनेक किस्से आणि आठवणींना उजाळा देणारा ठरला.

0
IMG-20260809-WA0021
Spread the love

सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेस रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आदर्श संयोजक पुरस्काराने गौरविले जाते. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांना प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते.

या वेळी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, पुणे हे गुणवत्तेला मान्यता देणारे शहर आहे. प्रत्येक पुणेकर सांस्कृतिक बुलंदीचे द्योतक आहे. उत्तमोत्तम सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम पुण्यातच घडू शकतात. अशा छोटेखानी कार्यक्रमांमधून पुणे शहराची ओळख सांस्कृतिक शहर म्हणून झाली आहे. सरपोतदार कुटुंबिय आणि चित्रपट सृष्टी यांच्यातील नाते मोलाचे असल्याचेही ते म्हणाले. रंगत-संगत प्रतिष्ठानने पुण्याच्या सांस्कृतिक, सामाजिक पटलावर आपला वेगळा ठसा उमटविला असल्याचेही त्यांनी गौरवाने सांगितले.

सचिन ईटकर म्हणाले, पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच महाराष्ट्राचा कला व संस्कृतीचा वारसा जपणारी संस्था आहे. सरपोतदार कुटुंब समाजाचा विचार करणारे आहे. पूना गेस्ट हाऊस शिवाय पुण्याचा इतिहास लिहिला जाऊ शकणार नाही. भारताच्या सांस्कृतिक संचितात त्यांचा मोठा वाटा आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. किशोर सरपोतदार म्हणाले, पुरस्कारासाठी काम न करणाऱ्या संस्थेला, व्यक्तीला हा पुरस्कार दिला जात आहे. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्या माध्यमातून कलाकारांचे माहेरघर-आजोळ ही वडिलांची संकल्पना आम्ही पुढे सुरू ठेवली आहे. अनेक साहित्यिक व कलाकारांना रसिकांपुढे आणण्याचे कार्य स्नेह मंचच्या माध्यमातून घडत आहे. पूर्वजांनी लावलेल्या या बिजाला कलाकार आणि रसिक खतपाणी घालत असून त्याचे कल्पवृक्षात रूपांतर झाले आहे.

प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, कार्यक्रमाच्या आयोजनात संयोजकाची भूमिका मोलाची असते. संयोजक कलाकाराला रसिकांपर्यंत नेत मंच उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत असतात. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्या कार्याची दखल घेऊन सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. प्राजक्ता वेदपाठक यांनी सूत्रसंचालन तर राजकुमार सुराणा यांनी मानपत्राचे वाचन केले.

‘सर’पोटाचा आधार….
पूर्वीच्या काळी महनीय व्यक्तीला ‘सर’ ही पदवी दिली जात असे. पूना गेस्ट हाऊसने कलाकारांशी स्नेह जपत कलाकरांचे माहेरघर अशी ओळख निर्माण केली आहे. पूना गेस्ट हाऊसमधील लज्जतदार पदार्थांमुळे कलाकारांना तृप्ततेचा आनंद मिळतो. त्यामुळे डॉ. सरपोतदार यांच्या विषयीची व्याख्या ‘सर’पोटाचा आधार अशी प्रवीण तरडे यांनी केल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

फोटो : रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात (डावीकडून) मैथिली आडकर, ॲड. प्रमोद आडकर, डॉ. किशोर सरपोतदार, प्रवीण तरडे, सचिन ईटकर.

प्रति,
मा. संपादक
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आदर्श संयोजक पुरस्काराने पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांना रविवारी (दि. ९) यांना सन्मानित करण्यात आले. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
ॲड. प्रमोद आडकर, अध्यक्ष, रंगत-संगत प्रतिष्ठान
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी