तब्बल तेरा विनोदी व्यक्तिरेखांचे प्रभावी एकल सादरीकरण
रंगला मृदुला मोघे यांच्या ‘एकापेक्षा एक’ बहुरूपी कार्यक्रमास रसिकांची दाद
पुणे : समाजात हरघडी आपल्या आसपास सहज भेटणाऱ्या वेगवेगळ्या स्वभाववैशिष्ट्यांच्या व्यक्तिरेखांची भेट, त्यांच्याशी होत राहणारा संवाद, विनोदाची चुरचुरीत फोडणी आणि लोकप्रिय गीतांची त्याला दिलेली जोड, असा झकास मनोरंजन करणारा मृदुला मोघे यांचा ‘एकापेक्षा एक’ हा विनोदी एकपात्री कार्यक्रम रंगला. एकाच व्यक्तीने केलेले तेरा विनोदी व्यक्तिरेखांचे सादरीकरण, हे या प्रयोगाचे वैशिष्ट्य होते.
एकपात्री कलाकार मृदुला मोघे यांचे प्रभावी सादरीकरण आणि प्रसिद्ध लेखिका विनीता पिंपळखरे यांचे लेखन – दिग्दर्शन, यातून विघ्नहर्ता प्रस्तुत आणि मुकुल निर्मित एकापेक्षा एक हे सादरीकरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात रसिकांच्या हाऊसफुल गर्दीत शनिवारी हा प्रयोग सादर झाला. लेखिका विनीता पिंपळखरे यावेळी उपस्थित होत्या. मृदुला मोघे या उत्तम अभिनेत्री आणि गायिकाही आहेत. त्या संगीत अलंकार असून, डा. प्रभा अत्रे यांच्या शिष्या आहेत. या कार्यक्रमात त्यांनी लावणी, नाट्यगीत, भावगीत, चित्रपटगीत असा गाण्यांचा कोलाजही साकारला.
विदेशी सून आणि अस्सल देशी सासू यांच्यातील खटकेबाज संवाद, लोकलमध्येच पार पडणारे हळदीकुंकू, डोहाळजेवणासारखे घरगुती समारंभ, संगीत मानापमानचा प्रयोग सुरू असतानाच, मध्येच विंगेत जात अटेंड केलेले फोन कॉल्स आणि त्यावरील विनोदी संभाषण, नाही मी बोलत, या पदाच्या शब्दांना विरोधी धार देणारा विंगेतला सततचा बोलघेवडेपणा, आधुनिक काळात माजलेले भविष्याचे खूळ, त्यातून निर्माण होणारे विनोद, वय सरले तरी पत्रिका बघण्याचा नाद, रिअलिटी शो च्या प्रभावातून घडणारे बेसूर विनोद, काळाच्या ओघात वाहून गेलेले दिवस धरून ठेवण्याची बुजुर्गांची वृत्ती अशा अनेक अनुभवांवरील छोटेसे, विनोदी ढंगातले हलकेफुलके भाष्य, अशा स्वरुपाच्या या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली. एकापेक्षा एक मधील विनोद प्रामुख्याने शाब्दिक स्वरूपाचा असला, तरी तब्बल तेरा विविध प्रकारच्या, नानाविध स्वभाववैशिष्ट्यांच्या बेरकी व्यक्तिरेखा पेश करताना मृदुला मोघे यांचे ऊर्जायुक्त सादरीकरण महत्त्वाचे ठरले. सूर निरागस हो, या वंदनेपासून सुरू झालेल्या या सादरीकरणाची सजल नयन नित धार बरसती, या भैरवीपर्यंतची वाटचाल, रसिकांची सातत्याने दाद मिळवत उत्तरोत्तर रंगत गेली.
फोटो : मृदुला मोघे
प्रति,
मा. संपादक
मृदुला मोघे यांचा ‘एका पेक्षा एक’ एकपात्री बहुरूपी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१
