दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे पोलीस बांधवांना रेनकोट वाटप समारंभ उत्साहात संपन्न
पिंपरी-चिंचवड, दि. ६ ऑगस्ट : पावसाळ्यात ऊन, वारा आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे रेनकोट वाटप समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. रामचंद्र घाडगे हे होते. या कार्यक्रमास इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अभय दादा भोर, दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. दुर्गाताई भोर, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पोलीस दलाच्या निःस्वार्थ, कर्तव्यदक्ष व समाजहिताच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. पावसाळ्यात कर्तव्य बजावताना पोलीस बांधवांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अभय दादा भोर, दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. दुर्गाताई भोर तसेच कंपनीचे उद्योजक प्रतिनिधी श्री. विकास मंघानी आणि , श्री. सचिन भगत, श्री. अश्विन चांडक, श्री. रफिक शेख आणि सौ. रमा बनसोडे यांच्या हस्ते पोलीस विभागातील मान्यवर अधिकारी व पोलीस बांधवांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्षा कु. दुर्गाताई भोर म्हणाल्या की, दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून यापूर्वीही शहरातील वाहतूक नियोजन व जनजागृतीसाठी अनेक स्वयंसेवकांनी सक्रियपणे कार्य केले आहे. आगामी काळात शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचे स्वयंसेवक अधिक जोमाने पुढे येऊन वाहतूक व्यवस्थापनात आपला सक्रिय सहभाग नोंदवतील. पोलीस बांधवांच्या खांद्याला खांदा लावून वाहतूक नियोजन, जनजागृती आणि शिस्तबद्ध वाहतुकीसाठी सहकार्य करत शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष सातत्याने योगदान देत राहील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. अभय दादा भोर यांनी पोलीस दल समाजाच्या सुरक्षिततेसाठी करत असलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समाजहिताच्या प्रत्येक विधायक कार्यात दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष कायम पोलीस प्रशासनाच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. रामचंद्र घाडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे पोलीस बांधवांना निश्चितच प्रोत्साहन मिळते, तसेच दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाकडून स्वयंसेवकांच्या माध्यमातून वाहतूक नियोजन, सामाजिक उपक्रम आणि जनजागृतीमध्ये सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. वाहतूक पोलीस केवळ वाहतूक नियंत्रित करत नाहीत, तर अनेक प्रसंगी नागरिकांसाठी पालकत्वाची व मार्गदर्शकाची भूमिकाही पार पाडतात, असे त्यांनी नमूद केले. पुढील काळात शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस दल अधिक प्रभावी नियोजनासह सातत्याने प्रयत्नशील राहील आणि नागरिकांच्या सहकार्याने वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी स्पाईन रोड भोसरी पोलीस ठाण्याचे हवालदार श्री. विभीषण ठोंबरे यांनी आभार प्रदर्शन केले. त्यांनी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाने सामाजिक उपक्रमांसह पोलीस विभागाच्या विविध उपक्रमांमध्ये सातत्याने सहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले व भविष्यातही असेच सहकार्य कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष
