August 7, 2026

मराठी चित्रपटांना आता मिळणार जागतिक मार्केट

0
IMG-20260806-WA0013(1)
Spread the love

मीडिया शिपर्स आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वितरण कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

पुणे, दि. ४ (प्रतिनिधी): दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे मराठी चित्रपट तयार होत असले, तरी प्रभावी वितरण व्यवस्थेअभावी त्यांना अपेक्षित प्रेक्षक मिळत नाहीत. ही दरी भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि मीडिया शिपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आता थेट जगाचे मार्केट’ या विशेष कार्यशाळेत मराठी चित्रपटांसाठी जागतिक वितरणाच्या नव्या संधींचा मार्ग खुला करण्यात आला. या माध्यमातून मराठी चित्रपटांना १०० हून अधिक देशांतील बाजारपेठ आणि १८०० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती देण्यात आली.

या कार्यशाळेत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विशेषत्वाने भेट दिली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,मीडिया शेफर्सचे सहसंस्थापक उदय घारे तसेच ज्येष्ठ वितरण तज्ज्ञ अनंत नाईक यांनी निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मराठी चित्रपट वितरणावरील परिसंवादात ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे आणि दिग्दर्शक अजय सिंह यांनी सहभाग घेत मराठी चित्रपटांच्या जागतिक वितरणाच्या संधींवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, उपाध्यक्ष धनाजी यमकर, कोषाध्यक्ष सुनील महाजन, संचालक अजित शिरोळे, राज काझी, वासू पाटील आणि मीडिया शिपर्सचे शीतल वैद्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा डोळस यांनी केले.

प्रास्ताविकात मेघराज राजेभोसले म्हणाले की, मराठी चित्रपट निर्मिती आता सोपी झाली असली तरी वितरण ही सर्वात मोठी अडचण आहे. मीडिया शिपर्सच्या सहकार्यामुळे मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ आणि १८०० हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार असून, हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

मीडिया शिपर्सचे सहसंस्थापक उदय घारे यांनी चित्रपट निर्मितीबरोबरच त्याची ब्रँड व्हॅल्यू, लक्ष्य बाजारपेठ आणि डिजिटल वितरणाचे नियोजन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. केवळ थिएटर व्यवसायावर अवलंबून न राहता ओटीटी, डिजिटल हक्क आणि आंतरराष्ट्रीय विक्री यावरही निर्मात्यांनी भर द्यावा, असे त्यांनी नमूद केले.

ज्येष्ठ वितरण तज्ज्ञ अनंत नाईक यांनी चित्रपटाच्या निर्मितीपासूनच वितरण आणि मार्केटिंगचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. चित्रपट कोणत्या बाजारपेठेत विकला जाऊ शकतो याचा अभ्यास करून आगाऊ करार केल्यास निर्मात्यांना अधिक व्यावसायिक यश मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेला निर्माते ,वितरक आणि चित्रपट क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

चौकट :

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात येणार असून सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील. तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध जागा मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक आणि रामटेक येथे नवीन फिल्म सिटी उभारण्यात येणार असून कर्जत येथील नितीन देसाई स्टुडिओ शासनामार्फतच चालवला जाईल आणि तेथेही मराठी चित्रपटांना चित्रीकरणासाठी मोफत सुविधा दिली जाईल.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, येत्या सहा महिन्यांत मराठी चित्रपटसृष्टीला उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे या क्षेत्रात स्टार्टअप्स निर्माण होण्यास चालना मिळेल, तसेच कर्ज सुविधा मिळणे सुलभ होईल. याशिवाय ॲनिमेशन आणि स्टुडिओ निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील पहिल्या ३० उद्योजकांना शासनाकडून अनुदान दिले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी