July 22, 2026

ऐतिहासिक भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी- महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षांतच काम पूर्ण करण्याचे उपमहापौरांचे निर्देश

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे : प्रतिनिधी

बुधवार पेठेतील ऐतिहासिक भिडे वाडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीच्या कामाची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकारी, अभियंते आणि वास्तुविशारदांकडून कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्मारकाचे काम दर्जेदार, नियोजित वेळेत, महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षांतच आणि ऐतिहासिक वारशाला साजेसे पूर्ण करण्याच्या सूचना उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिल्या.  

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी सन १८४८ मध्ये याच भिडे वाड्यात भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाची क्रांतिकारी मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे भारतीय सामाजिक इतिहासात या वास्तूला विशेष महत्त्व असून ती प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणास्थान मानली जाते. पाहणी दौऱ्यावेळी भवन विभागाचे अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, कार्यकारी अभियंता धायगुडे, उपअभियंता पांडकर तसेच आर्किटेक्ट धनंजय सालकर उपस्थित होते.

पाहणीदरम्यान स्मारकाच्या वास्तुरचनेची सद्यस्थिती, विविध विकासकामे तसेच पुढील टप्प्यांतील नियोजनाची माहिती अधिकाऱ्यांनी उपमहापौर  वाडेकर यांना दिली. स्मारकात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रेरणादायी अनुभव मिळेल, यासाठी आवश्यक सुविधा आणि माहितीपर उपक्रम विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या.

यावेळी भिडे वाड्याच्या जतन आणि संवर्धनासाठी झालेल्या पहिल्या आंदोलनाची आठवण जागवताना वाडेकर यांनी त्यांच्यावर ऊयाय आंदोलणासाठी 11 गुन्हे दाखल असल्याचे सांगितले.  या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण व्हावे आणि भावी पिढ्यांसाठी ती प्रेरणास्थान म्हणून उभी राहावी, अशी त्या आंदोलनामागील भावना होती. आज त्याच संकल्पनेचे राष्ट्रीय स्मारकाच्या रूपाने साकार होत असलेले चित्र समाधानकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी वंचित, शोषित आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेले कार्य संपूर्ण मानवतेसाठी दीपस्तंभ असल्याचे नमूद करण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वासही वाडेकर यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी