July 9, 2026

वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंग परमात्म्याचीच सेवा

0
IMG-20260708-WA0085
Spread the love
  • मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन; वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ
  • ‘सिंबायोसिस’ व सौ शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टतर्फे वारंकऱ्यांसाठी २६ वर्षांपासून उपक्रम

पुणे: “आषाढी वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक व वैभवशाली परंपरा आहे. श्रीक्षेत्र देहू व आळंदी येथून लाखो वारकरी ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन विठूनामाचा गजर करत पंढरपूरच्या वाटेवर चालत आहेत. पायी वारीत चालून थकलेल्या, शिणलेल्या या वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवा असून, हे पुण्याचे काम आपल्या हातून होतेय, याचे समाधान आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पंढरपूर प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने ‘फिरता वारकरी दवाखाना’ या उपक्रमाचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. सेनापती बापट रस्त्यावरील सिम्बायोसिस भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते ऍड. निलेश निकम, ऍड. अविनाश साळवे, ‘सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, ‘सिम्बायोसिस’चे डॉ. राजीव येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, अधिष्ठाता डॉ. शशीधर उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याला सुरुवात झाली असून, राज्यभरातून लाखो वारकरी या वारीत चालतात. पुण्यातील अनेक संस्था आपापल्या परीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटत असतात. विठुरायाच्या भेटीसाठी ऊन-वारा, पाऊस, तहान-भूक विसरून निघालेल्या या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी घेतलेला हा ज्ञानदानाच्या पलीकडे जाऊन सामाजिक भान जपणारा आहे.”

मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “गेल्या २६ वर्षांपासून अविरतपणे सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपक्रम स्तुत्य आहे. वारकरी सेवेचे हे व्रत इतरांसाठीही प्रेरक आहे. वारकऱ्यांचे दुःख हलके करण्याचे, त्यांना वारीत चालताना अडचणी येऊ नयेत, यासाठी औषधे व आरोग्य सेवा देतानाच आपल्या हातून पांडुरंगाची सेवा घडत आहे. पालिकेच्या वतीनेही वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.”

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “राज्यभरातून वारकरी आळंदी व देहूमध्ये दाखल झाले आहेत. पंढरीच्या दिशेने चालताना त्यांची सेवा करण्याची संधी हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. परदेशातून, परप्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांना हा अनुभव समृद्ध करणारा असतो. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दृष्टीकोन विकसित होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अतिशय महत्वाचा वाटतो.”

प्रास्ताविकात ऍड. अविनाश साळवे म्हणाले, “संतसेवेचा हा उपक्रम २००१ मध्ये एक अँब्युलंसपासून सुरु केला. यंदा १० सुसज्ज मोठ्या अँब्युलंस, दुचाकी अँब्युलंस व ३०० हुन अधिक डॉक्टर्स, नर्स आणि स्वयंसेवकांची टीम वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार यासह तातडीची आरोग्य सेवा व आपत्कालीन सेवेसाठी सज्ज असते. ही वारकरी आरोग्य सेवा अव्याहतपणे शेकडो वर्ष चालेल, असा विश्वास देतो.”

उल्हासदादा पवार म्हणाले, “वारी हा विचार, विवेक व वैराग्य याचा त्रिवेणी संगम आहे. या संगमात चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा ईश्वरभक्तीची अनुभूती देते. हे पुण्याचे काम या दोन्ही संस्था सद्भावना आणि मानवतेचा विचार जपत एकत्रितपणे गेली २६ वर्षे करत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे.”

डॉ. विद्या येरवडेकर यांनी सांगितले की, वारी ही स्वयंनियोजित, स्वयंशिस्तीने चालणारी परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी या वारीमध्ये सहभागी व्हावेच; पण यावर संशोधनही करावे. व्यवस्थापन, नियोजन, स्वच्छता, सामाजिक समरसता या वारीमध्ये अनुभवायला मिळते.

वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी आरोग्य सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. रेवती पाठक यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर दरोडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी