बारामती म. ए. सो. हायस्कूलच्या १९७९/८०/८१ च्या माजी विद्यार्थिनींचा पुणे येथे भावपूर्ण स्नेहमेळावा
पुणे, येथे बारामती म. ए. सो. हायस्कूलच्या १९७९/८०/८१ च्या माजी विद्यार्थिनींचा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. या स्नेहमेळाव्याचे आयोजन शाळेच्या माजी शिक्षिका कोकिळा शहा बाई यांनी विद्यार्थिनींच्या भेटीची ओढ लक्षात घेऊन निबंधे बाई यांच्या सहकार्याने केले होते. तसेच सौ. बुचके बाई यांचेही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
या स्नेहमेळाव्यात सुमारे १० माजी शिक्षिका आणि ७० हून अधिक माजी विद्यार्थिनी सहभागी झाल्या. तब्बल ४५ वर्षांनंतर गुरु-शिष्यांची झालेली ही भेट सर्वांसाठीच अविस्मरणीय ठरली. अनेक वर्षांनंतर एकमेकींना भेटताना भावना अनावर झाल्या. शिक्षिकांनी विद्यार्थिनींना प्रेमाने आशीर्वाद दिले, तर विद्यार्थिनींनीही आपल्या गुरूजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात मनीषा टांकसाळे यांच्या मधुर गायनाने झाली. त्यानंतर संगीता बर्वे यांनीही सुरेल गीतांनी वातावरण अधिक रंगतदार केले. गप्पा, आठवणी, छायाचित्रे, गुरूंचा सत्कार व पूजन, भेटवस्तूंची देवाणघेवाण यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक आणि आनंदमय झाले.
कोकिळा शहा बाई यांनी आईच्या मायेने अधिकमासानिमित्त सर्व विद्यार्थिनींना स्वादिष्ट व प्रेमाने भरलेले जेवण देऊन जणू आपल्या लेकींचे लाड पुरवले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी सौ. सुनीती जोगळेकर यांनी सादर केलेल्या हृदयस्पर्शी कवितेने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. निरोपाची वेळ येताच सर्वांनी पुन्हा लवकरच भेटण्याचा निर्धार करत जड अंतःकरणाने एकमेकांचा निरोप घेतला.
या स्नेहमेळाव्यास कोकिळा शहा बाई,सहस्रबुद्धे बाई , पटवर्धन बाई , निबंधे बाई , इंगळे बाई , वाटवे बाई , कुलकर्णी बाई , अत्रे बाई , सौ. बुचके बाई तसेच मोने सर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी काश्मीरा गुजर, सविता तावरे, प्रतिभा निलाखे, मनीषा टांकसाळे, सुनीती जोगळेकर, राधिका शहा यांच्यासह सर्व माजी विद्यार्थिनींनी मनापासून परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमाचे मीडिया कव्हरेज शाळेच्या माजी विद्यार्थिनी मंजूषा खोचरे ,पूजा कुलकर्णी यांनी केल्यामुळे या अविस्मरणीय सोहळ्याला अधिक व्यापक प्रसिद्धी मिळाली.
