July 9, 2026

ZEE5वर ‘फ्रेम’चा प्रीमियर: कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा

0
IMG-20260708-WA0029
Spread the love

8 जुलै 2026 : मराठी ZEE5ने ‘फ्रेम’या आपल्या आगामी ओरिजिनल चित्रपटाची घोषणा केली आहे. व्यावसायिक जबाबदारी आणि माणुसकी यांच्यातील नाजूक सीमारेषेचा वेध घेणाऱ्या या प्रभावी सामाजिक चित्रपटाच्या कथानकात सतत नैतिक मूल्यांची कसोटी घेण्यात आली आहे. विक्रम पटवर्धन यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात नागराज मंजुळे, अमेय वाघ, मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. फोटो जर्नालिझमच्या माध्यमातून शोकांतिकेचे चित्रण करताना त्यासाठी मोजावी लागणारी भावनिक आणि नैतिक किंमत हा या चित्रपटाचा मध्यवर्ती विषय आहे. चित्रपटाचा प्रीमियर 10 जुलै 2026 रोजी मराठी ZEE5वर होणार आहे.

महत्त्वाचा तपशील :

शीर्षक : फ्रेम

प्लॅटफॉर्म : मराठी ZEE5

भाषा : मराठी

प्रकार : सामाजिक नाट्य

प्रीमियर : 10 जुलै 2026

दिग्दर्शक : विक्रम पटवर्धन

निर्मिती : आटपाट आणि झी स्टुडिओज

कलाकार : नागराज मंजुळे, अमेय वाघ, मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव

‘फ्रेम’कशाबद्दल आहे?

‘फ्रेम’ हा एक प्रभावी सामाजिक चित्रपट असून तो व्यावसायिक जबाबदारी आणि माणुसकी यांच्यातील नाजूक सीमारेषेचा वेध घेतो. नैतिकतेची सतत परीक्षा घेणाऱ्या आणि योग्य-अयोग्य यांच्यातील सीमा अनेकदा धूसर होणाऱ्या परिस्थितीचे वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात आहे. पुण्यातील एका वृत्तपत्राच्या न्यूज रूमच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत अनुभवी छायाचित्र पत्रकार चंदू पानसरे आणि आदर्शवादी नवोदित सिद्धार्थ देशमुख यांच्या प्रवासातून व्यावसायिक कर्तव्य आणि संवेदनशीलता यांच्यातील संघर्ष उलगडला जातो. “आधी फोटो, मग बाकी सगळं” या भूमिकेवर ठाम असलेला चंदू आणि माणुसकी जपत पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करणारा सिद्धार्थ यांच्यातील विचारांचा संघर्ष या चित्रपटाचा गाभा आहे.

विनाशकारी भूकंपामुळे या दोघांच्या परस्परविरोधी विचारांची खरी कसोटी लागते. मृत्यू, विध्वंस आणि जगण्यासाठीच्या संघर्षाने व्यापलेल्या परिस्थितीत ते सापडतात. ढिगाऱ्याखाली दबलेल्या आयुष्यांचे, अपरिमित दुःखाचे आणि आशेचे क्षण कॅमेऱ्यात टिपताना निरीक्षकाची भूमिका आणि प्रत्यक्ष सहभागी असलेल्या व्यक्तीची भूमिका यांच्यातील सीमारेषा हळूहळू धूसर होत जाते. प्रत्येक छायाचित्र टिपायचे की नाही, या निर्णयासोबत त्यांना स्वतःच्या मूल्यांचा पुनर्विचार करावा लागतो. मानवी दुःखाचे साक्षीदार होण्याची आणि त्याचे दस्तावेजीकरण करण्याची भावनिक व नैतिक किंमत त्यांना अनुभवावी लागते.

‘फ्रेम’वेगळा का ठरतो :

एखाद्या घटनेचे वार्तांकन करताना पत्रकार आणि छायाचित्र पत्रकारांसमोर उभ्या राहणाऱ्या नैतिक द्विधा मनःस्थितीचा वेध घेणारी कथा
अनुभवी, कट्टर प्रोफेशनल आणि या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू पाहणारा नवोदित यांच्यातील विचारसंघर्षाचे प्रभावी चित्रण
छायाचित्रणाच्या माध्यमातून सत्य, जबाबदारी आणि संकटकाळातील माध्यमांची भूमिका यांचा वेध
न्यूजरूमच्या चौकटीपलीकडे जाऊन मथळ्यांमागील आणि ब्रेकिंग न्यूजमागील मानवी भावविश्व उलगडणारी कथा
एखाद्या घटनेचा साक्षीदार राहणे आणि मदतीसाठी पुढे सरसावणे यांमधील निवडीबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर विचार करायला भाग पाडणारा कंटेन्ट
विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भावनिक कथनशैली आणि तीव्र मानवी नाट्याचा प्रभावी मिलाफ
महत्त्वाकांक्षा, नैतिकता, मूल्ये आणि व्यावसायिक जबाबदारी यांचा अत्यंत वैयक्तिक पातळीवर वेध घेणारी मांडणी
चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षकांना विचार करायला लावणारे परिपक्व आणि अनेक स्तर उलगडणारे कथानक

झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर आणि मराठी ZEE5च्या बिझनेस हेड व्ही. आर. हेमा म्हणाल्या :

“मराठी ZEE5 हे महाराष्ट्रातील दर्जेदार आणि प्रभावी कथांसाठीचे विश्वासार्ह व्यासपीठ बनले आहे. त्याच ध्येयाशी सुसंगत असा ‘फ्रेम’ हा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसमोर आणत आहोत. व्यावसायिक जबाबदारी आणि मानवी संवेदनशीलता यांचा संघर्ष समोर आल्यावर माणसाला कोणते कठीण निर्णय घ्यावे लागतात, याचा वेध घेणारा हा प्रभावी चित्रपट आहे. नागराज मंजुळे, अमेय वाघ आणि विक्रम पटवर्धन यांसारख्या गुणी कलाकार व दिग्दर्शकांसोबत काम करत अशा आशयघन आणि विचार करायला लावणाऱ्या कथा ओटीटीवर सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो. मनोरंजनासोबत प्रेरणा देणाऱ्या आणि दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या अस्सल मराठी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या प्रयत्नांतील आणखी एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे ‘फ्रेम’.”

दिग्दर्शक विक्रम पटवर्धन म्हणाले : “‘फ्रेम’ हा केवळ कॅमेऱ्याच्या नजरेतून नव्हे, तर माणुसकीच्या दृष्टीकोनातूनही जगाकडे पाहण्याचा प्रयत्न आहे. चंदू आणि सिद्धार्थ यांच्यातील नात्याच्या माध्यमातून कथाकथन आणि जगण्याकडे पाहण्याच्या दोन वेगळ्या दृष्टिकोनांचा शोध घेण्याची संधी आम्हाला मिळाली. आयुष्यातील अनिश्चितता आणि अनपेक्षित वळणांचाही हा चित्रपट वेध घेतो. अशा परिस्थितीत व्यावसायिक जबाबदारी आणि माणुसकी यांच्यातील धूसर होत जाणाऱ्या सीमारेषेवर व्यक्तिरेखा उभ्या राहतात, जिथे कर्तव्य आणि करुणा यांपैकी एकाची निवड करणे हेच सर्वांत मोठे आव्हान असते.”

नागराज मंजुळे म्हणाले :“चंदू ही पारंपरिक नायकाची व्यक्तिरेखा नाही. त्यामुळे त्याची भूमिका साकारणे माझ्यासाठी तितकेच रंजक आणि आव्हानात्मक होते. तो आपल्या कामाप्रती अत्यंत समर्पित आहे, तडजोड न करणारा आहे आणि वास्तवाचे दस्तावेजीकरण करणे हेच आपले काम आहे, त्यात हस्तक्षेप करणे नव्हे, असा त्याचा ठाम विश्वास आहे. मात्र चित्रपटभर त्याच्या या धारणांची कसोटी लागते. त्याच्या भूमिकेशी सहमत व्हावे की नाही, याबाबत प्रेक्षकही स्वतःलाच प्रश्न विचारू लागतील.”

अमेय वाघ म्हणाला :  “सिद्धार्थ ही संवेदनशीलता, आदर्शवाद आणि आव्हानात्मक क्षेत्रात पाऊल ठेवताना अनेक तरुण व्यावसायिकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिरेखा आहे. ‘फ्रेम’मधील त्याचा प्रवास म्हणजे महत्त्वाकांक्षा आणि जबाबदारी यांच्यामध्ये संवेदनशीलतेला नेमके कुठे स्थान द्यायचे, याचा शोध आहे. त्याचा संघर्ष आणि त्याच्यासमोर उभे राहणारे निर्णय प्रेक्षकांना नक्कीच भावतील, असा मला विश्वास आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी